

जव्हार, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यात अधिकाधिक आदिवासी लोकवस्ती असून, ग्रामीण भागात ती विखुरली आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या भागात जंगल परिसर अधिक असल्याने हंगामानुसार उपलब्ध होणाऱ्या रानमेव्यापासून येथील नागरिक गुजराण करत असतात. मात्र, अचानक वणवे लागून जंगले नष्ट होत असल्याने वनसंपत्ती ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वणवे या विषयावर जव्हार वन विभागामार्फत एक मोहीम राबवून जनजागृती करण्याची मागणी केली जात आहे.
दरवर्षी जव्हारच्या डोंगर व जंगलात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गवत, झाडेझुडपे, वेलवर्गीय वनस्पती उगवत असतात. पावसाळा संपल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांच्या दरम्यान या उगवलेल्या गवत व इतर वनस्पती वाळू लागतात. यादरम्यान डोंगर, जंगलातील मोठ्या झाडांचा वाळलेला पाला जमिनीवर पडलेला असतो. याच वाळलेले गवत व इतर वनस्पती; तसेच पालापाचोळ्याला अनेकदा वणवे लावण्याचे प्रकार काहींकडून लावले जातात. अनेकदा गैरसमजुतीनेही वणवे लावले जातात. या वणव्यामध्ये अनेकदा संपूर्ण डोंगरच्या डोंगर, जंगले जळून खाक होऊन निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. यात वनसंपदा नष्ट होतात. अनेकदा पशू-पक्षी, वन्यप्राणी होरपळून निघतात.
त्यामुळे वणवे नियंत्रणासाठी आत्तापासूनच वन विभागाकडून जनजागृती; तसेच वन वणवा याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा घेण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
भूगर्भातील जलस्रोतांवर परिणाम
गवत, पालापाचोळा जळून गेल्यामुळे पाऊस पडला तरी पावसाचे पाणी डोंगररांगांत साचले जात नाही. ते थेट नदीकडे वाहत असते. त्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. काही अंशी याचा परिणाम भूगर्भातील जलस्रोतांवर होत आहे.
उपाययोजना काय असाव्यात?
* गावागावांत निसर्गमित्र तयार करावेत.
* वणवा विषयावर पथनाट्य सादरीकरण व्हावे.
* जनजागृतीत शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.
* वणवे नियंत्रणासाठी सामाजिक संस्थांना सोबत घ्यावे.
* वणव्याविषयीच्या ज्येष्ठांच्या गैरसमजुती दूर कराव्यात. शक्य असेल तेथे जाळपट्टे काढावेत.
जव्हार तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वणवे लागतात. वन विभागाकडून मोजक्याच ठिकाणी कारवाया केल्या जातात. मात्र, फक्त जनजागृती किंवा कारवाया करून वणवे नियंत्रित होणार नाहीत. यासाठी ज्या ग्रामपंचायत हद्दीत वणवे लागणार नाहीत, अशा ठिकाणी वन विभागाने बक्षिसे द्यावीत. वणवे लागणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रांवर कारवाई करावी. यामुळे बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येईल.
- जितेंद्र पाटील, अध्यक्ष, वन्यप्रेमी मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.