शतप्रतिशतसाठी भाजपचा ‘पंच’

शतप्रतिशतसाठी भाजपचा ‘पंच’
Published on

विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे यश मिळवले आहे. तिसऱ्यांदा भाजपचा मुख्यमंत्री बसणार असून राज्याच्या कारभारावरही प्रभाव राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या बहुमतासाठी १२ जागा कमी असल्या तरी भविष्यातील निवडणुकीत शतप्रतिशतचा अजेंडा राबवण्याची दाट शक्यता आहे. तसेच सरकारमध्ये काम करताना अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या कसलेल्या मंत्र्यांशी दोनहात करण्यासाठी नव्या चेहऱ्यांबरोबरच सरकारला मजबुती देणारे अनुभवी, उत्तम प्रशासक तसेच भाजपचा अजेंडा तळागाळात पोहोचवणाऱ्या पाच तगड्या चेहऱ्यांचेही मंत्रिमंडळातील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे.
------------------------------------------
राधाकृष्ण विखे-पाटील
विरोधी पक्षनेतेपदी असताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना थेट महसूलमंत्रिपद देऊन भाजप नेतृत्वाने त्यांचा सन्मान राखला. शांत, संयमी असलेल्या विखे-पाटील आता भाजपशी एकरूप झाले आहेत. मराठा चेहरा तसेच प्रशासनाचा त्यांचा उत्तम अनुभव सरकारसाठी महत्त्वाचा असेल. लोकसभेत सपाटून मार खाल्लेल्या विखे-पाटील यांनी अहिल्यानगरमध्ये भाजपला चांगले यश मिळवून दिले आहे.
कामगिरी - बाळासाहेब थोरात यांना नवव्यांदा विधानसभेत प्रवेशापासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका.
-------------------------------------------------------
चंद्रकांत पाटील
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अत्यंत चांगले संबंध असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी महसूल, सार्वजनिक बांधकामांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचा कारभार हाताळला आहे. उत्तम संघटक म्हणून त्यांची भाजपमध्ये ओळख आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. भाजपच्या महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक चेहरा असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा अनुभव या सरकारमध्ये कामी येईल.
कामगिरी- कोथरूड मतदारसंघातून एक लाख १२ हजार मताधिक्याने विजय.
-------------------------------------------
सुधीर मुनगंटीवार
विदर्भात रेकॉर्ड ब्रेक सातव्यांदा निवडून आलेले मुनगंटीवार हे पक्षाचा महत्त्वाचा चेहरा आहेत. २०१४ मध्ये अर्थमंत्रिपदाची धुरा त्यांनी सक्षमपणे हाताळली. यावेळी वने, मत्स्य व्यवसाय, सांस्कृतिक कार्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. कल्पक योजना आखणे, प्रशासकीय यंत्रणेकडून त्या राबवून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या कल्पकतेने त्यांनी वन विभागाचा चेहरामोहरा बदलला. फडणवीस यांच्यानंतर राज्याच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची खडानखडा माहिती असणाऱ्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे नाव येते. दोन वर्षांत विस्कळित झालेली प्रशासकीय यंत्रणा रुळावर आणणे तसेच सरकारचा अजेंडा तळागाळात घेऊन जाण्यात मुनगंटीवार यांचा अनुभव कामी येईल.
कामगिरी- वर्धा व चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री म्हणून पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले.
----------------------------------------
चंद्रशेखर बावनकुळे
प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. मात्र, सहा महिन्यांत भाजपसह महायुतीने दणदणीत यश मिळवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी विधानसभा निवडणुकांचे नियोजन केले. २०१९ मध्ये आमदारकीचे तिकीट कापलेल्या बावनकुळे यांनी राजकारणात जबरदस्त कमबॅक केला आहे. २०१४ मध्ये ऊर्जामंत्रिपदाचा कारभार सांभाळला, अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारा मंत्री म्हणून त्यांनी नाव कमावले. सरकारला गती देण्यासाठी बावनकुळे यांचा चेहरा महत्त्वाचा असणार आहे.
कामगिरी - विदर्भात आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी.
--------------------------------------------------
गिरीश महाजन
महायुती सरकारचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांची ओळख आहे. सुरुवातीला काहीसे लो-प्रोफाईल असलेले गिरीश महाजन यांचे भाजपमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मराठा आंदोलनापासून सर्वच आंदोलनात गिरीश महाजन यांनीच यशस्वीपणे मध्यस्थी केली. याशिवाय वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकाससारखी महत्त्वाची खाती त्यांनी हाताळली आहेत. यावेळी महायुतीमध्ये तसेच सरकारपुढे निर्माण होणारी संकटे हाताळण्यासाठी महाजनांचा अनुभव कामी येईल.
कामगिरी - उत्तर महाराष्ट्रात भाजपची सरशी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com