

‘आपली चिकित्सा’साठी प्रतीक्षा कायम
पालिकेकडून पुन्हा निविदा, मुंबईकरांच्या अडचणीत वाढ
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईकरांच्या घराजवळ पॅथॉलॉजी सुविधा देण्यासाठी सुरू केलेली ‘आपली चिकित्सा’ अद्यापही निविदा प्रक्रियेत अडकली आहे. प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात काढलेली निविदा मार्चमध्ये रद्द करण्यात आली. निविदेतील एका अटीमुळे एक अपवाद वगळता दुसरा कोणताही निविदाकार निकष पूर्ण करू शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ‘आपली चिकित्सा’अंतर्गत मुंबईकरांना त्यांच्या घराजवळील दवाखाना आणि प्रसूतिगृहांमध्ये मोफत पॅथॉलॉजी चाचणीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक ‘आपली चिकित्सा’ योजना १५ डिसेंबरपासून बंद आहे. चाचणी सुविधेसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या कृष्णा डायग्नोस्टिकने निविदेतील अटींनुसार चाचणीची संख्या आणि रक्कम दोन्ही निकष पूर्ण केले आहेत. ही निविदा चार वर्षांसाठी होती; मात्र दीड वर्षात निर्धारित चाचण्या पूर्ण झाल्यामुळे निविदा संपली. ही योजना बंद झाल्यामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढल्या असून, उपनगरीय रुग्णालयांमध्ये तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही रुग्णालयांमध्ये तर नमुने चाचणीसाठी बाहेर पाठवले जात असल्याची माहिती रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी दिली. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महापालिकेने २१ जानेवारी रोजी एक निविदा काढली होती. त्यानंतर एप्रिलपासून चाचणी सुविधा पूर्ववत होईल, असा अंदाज होता; परंतु काही अडथळ्यांमुळे निविदा प्रक्रिया अडकली आणि ४ मार्च रोजी रद्द करण्यात आली.
-----
१ एप्रिलपासून सुविधा सुरू करणार
१. नव्या निविदा प्रक्रियेत तीन निविदाकारांनी भाग घेतला होता, परंतु केवळ एकाचा प्रतिसाद मिळाला. निविदाकारांच्या प्रयोगशाळा या मुंबई शहराबाहेर आहेत. त्यामुळे जमा केलेले नमुने प्रयोगशाळेत पोहोचणार कधी आणि रुग्णांना अहवाल मिळणार कधी, असा प्रश्नही उपस्थित झाला होता.
२. या सर्व बाबींचा विचार करता आणि निविदाकारांशी संवाद साधल्यानंतर प्रयोगशाळा महामुंबईत असली, तरी चालेल मात्र ती मुंबईजवळ असावी, जेणेकरून अहवालही वेळेवर देता येईल, असे सांगण्यात आले.
३. दरम्यान, आता १३ मार्च रोजी काढलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. पालिका दवाखाने, प्रसूतिगृहे आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘आपली चिकित्सा’ सुविधा चाचणी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाशी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.