

वाशी, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पाच वर्षांपासून लांबणीवर गेल्या आहे. राज्यात सत्तासंघर्ष झाल्यांनतर राजकीय गणितेही बिघडली आहे. मागील पाच वर्षांपासून पालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या राजकीय नेत्यांची मतदारांशी असणारी नाळ तुटू नये यासाठी खटाटोप सुरू आहेत. त्यामुळे हळदी-कुंकू हे महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. विशेष म्हणजे रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित केले जातात; मात्र रथसप्तमी होऊन एक महिना लोटला तरीही नवी मुंबईत हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून मतांचे वाण पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गत वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता ओबीसी आरक्षणाचा निकाल येणे बाकी आहे. ओबीसी आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील रखडलेल्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तळात चर्चा सुरू आहे. तसेच मागील पाच वर्षांपासून पालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या राजकीय नेत्यांची मतदारांशी असणारी नाळ तुटू नये यासाठी खटाटोप सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत पक्षांचे तिकीट मिळवून मतांचे दान पदरात पाडण्याची संधी साधली जात आहे. याचा प्रत्यय शहरामध्ये अनेक दिवसांपासून येत आहे. म्हणूनच मतदारांशी ‘इमोशनल बाँडिंग’ करून त्यांच्या नजरेत आपली प्रतिमा उंचावण्यासाठी इच्छुक उमेदवारांमार्फत राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये भर पडली ती हळदी-कुंकू समारंभाची. महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन संक्रांतीपासून वॉर्डा-वॉर्डामध्ये रंगू लागले आहे. हळदी-कुकूवाचे कार्यक्रम हे महिला मतदारांना खूश करण्यासाठी आयोजित केले जातात; तर हळदी-कुंकू समारंभ रथसप्तमीपर्यंत करण्यात येतो. आता रथसप्तमी होऊन दोन महिन्याचा कालावधी होत आला आहे. तरीही शहरामध्ये इच्छुक उमेदवारांनी हळदी-कुंकूवाचे कार्यक्रम सुरूच ठेवले आहेत.
-------------------
लकी ड्रॉ, खेळ पैठणीचा, भेटवस्तूंची लूट
केवळ इच्छुकच नव्हे; तर माजी नगरसेविका आणि नगरसेवक यांनीही हळदी-कुंकू समारंभाचा घाट घातल्याचे चित्र आहे. या कार्यक्रमात राजकीय नेते हजेरी लावत असून, राजकीय भाषणे देत उमेदवाराला मतांचा जोगवा मागण्याचे काम करत आहे. हळदी-कुंकू आणि तीळगुळाच्या वाटपाबरोबरच संक्रांतीला महत्त्व असते ते भेटवस्तू देण्याचे. या संधीचे सोने करत भेटवस्तूंची लूटही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याचप्रमाणे लकी ड्रॉ काढून महिलांना भेटवस्तू देण्याचे प्रकार सुरू आहेत. खेळ पैठणीचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात येत आहे.
-------------------
सिनेतारकांना बोलावण्याचे फॅड
महिलांच्या आवडी-निवडीच्या अनेक भेटवस्तू शब्दश: लुटल्या जात आहेत. नॉनस्टिक भांड्यांपासून पूजेच्या साहित्यापर्यंत सर्वच प्रकारांच्या भेटींनी हळदी-कुंकू समारंभ गाजत आहे. ताम्हण, चांदीचे पूजा साहित्य, प्लॅस्टिकचे डबे, साड्या, ताट, वाट्या अशा महिलांसाठी उपयोगी असणाऱ्या विविध वस्तूंचा या भेटींमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे आधीच्या समारंभात काय भेट मिळाली याच्या गप्पाही दुसऱ्या हळदी-कुंकू समारंभात चवीने मारल्या जात आहेत. बड्या राजकारणी नेत्याला समारंभात बोलवून वॉर्डमध्ये आपली प्रतिमा दाखवण्याचे इच्छुक नगरसेवक कार्य करत आहेत. त्याचबरोबर सिनेतारकांनासुद्धा बोलवून कार्यक्रमामध्ये गर्दी खेचण्याचेदेखील काम करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.