दादा, क्या हुआ तेरा वादा?

दादा, क्या हुआ तेरा वादा?
Published on

‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’
शेतकऱ्यांची कर्जमाफी; हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवार यांना सवाल

उल्हासनगर, ता. ३० (बातमीदार) : ‘सत्तेत बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू, वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ, असे आश्वासन देऊन महायुतीने शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली; पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही, हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे,’ अशी टाकी करीत ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी (ता. ३०) उपस्थित केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी उल्हासनगरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. या वेळी माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सपकाळ म्हणाले, की निवडणुकीच्या प्रचारात व जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले; मात्र सत्तेत येताच १० लाख बहिणींच्या नावांना कात्री लावण्यात आली. शेतकरी कर्जमाफीवर अर्थसंकल्पात एक शब्दही काढला गेला नाही. ट्रिपल इंजिन सरकारचे नेते मोदी-शाह यांचे सतत गुणगाण गात असतात. त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्र सरकारकडून राज्यासाठी स्पेशल पॅकेज घेऊन यावे.’ पुढे त्यांनी सांगितले, की डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या धोरणांमुळे देशात मध्यमवर्ग व उच्च मध्यमवर्ग वाढला; मात्र मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात या वर्गाचे कंबरडे मोडले आहे. लघु, छोटे व मध्यम उद्योजक देशोधडीला लागले आहेत. नोटबंदी व जीएसटीनंतर या व्यवसायांना अवकळा आली आहे. मोदी सरकारच्या काळात श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत असल्याची टीका या वेळी सकपाळ यांनी केली.

सत्ता केंद्रित करण्याचा डाव
काँग्रेस सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले, पण मोदी सरकारचे धोरण मात्र सत्ता केंद्रित करण्याचे आहे. भाजपला विशेषतः नरेंद्र मोदींना केंद्रात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सर्व सत्ता त्यांच्या हातात हवी आहे. या हट्टामुळेच गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडविल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘हम दो, हमारे दो’ असा आहे. आता आपल्याला लढायचे आहे आणि ही लढाई जीवन-मरणाची आहे, ‘करो या, मरो’ची आहे. त्यामुळे लढायची तयारी ठेवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com