

समान कामाला समान वेतनाची संघटनेची मागणी
पनवेल (बातमीदार) ः समान काम समान वेतन देण्याची मागणी आझाद कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. पनवेल महापालिकामधील कायमस्वरूपी सफाई कामगारांना सरकारी वेतनश्रेणीप्रमाणे पुरेपूर पगार दिला जातो, परंतु समान काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना मात्र पनवेल पालिका व ठेकेदार तुटपुंजे मानधन देतात. हा भेदभाव असून, तो कामगारांच्या श्रमप्रतिष्ठेचा अपमान असल्याचे कर्मचारीवर्गाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे समान कामाला समान वेतन मिळणे हा श्रमिकांचा हक्क असून, त्याची पनवेल पालिकेने त्वरित अंमलबजावणी करावी, असे निवेदन आझाद कामगार संघटनेच्या वतीने महादेव वाघमारे यांनी पनवेल पालिका आयुक्तांना दिले आहे. या निवेदनासोबत एकून ५३३ कामगारांची सूची जोडली आहे.
..........
खारघरमध्ये सिडकोकडून डेब्रिजमाफियांवर कारवाई
खारघर, ता. १० (बातमीदार) : सिडकोच्या दक्षता विभाग आणि अभियांत्रिकी विभागाच्या पथकाने खारघरमध्ये डेब्रिज टाकणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई केल्यामुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत.
खारघरमध्ये सेक्टर २५ सेंट्रल पार्क परिसरात सिडकोचे मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. या भूखंडावर रात्रीच्या वेळी डेब्रिजमाफियांकडून डेब्रिज टाकले जाते. त्यामुळे मोकळ्या मैदानावर डेब्रिजचे ढिगारे दिसून येत आहेत, तर या ठिकाणी काहींनी भंगार व्यवसायदेखील थाटला आहे. दरम्यान, सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पथकाकडून मोहीम राबवित असताना या मोकळ्या भूखंडावर शिवपूजन भारद्वाज हे चालक डम्परमधून मानवी आरोग्यास घातक असलेले डेब्रिज टाकीत असताना आढळून आले. त्यामुळे या चालकाविरुद्ध खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोचे दक्षता विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे यांनी सिडकोच्या विविध विभागांची कृती दल स्थापन केली आहे. खारघर परिसरात राडारोडा अवैधरित्या टाकणारी व्यक्ती दिसल्यास रहिवाशांनी www.cidco.maharashtra. gov. in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन मेंगडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.