

कल्याण तालुक्यात फिरते पोलिस ठाणे
टिटवाळा, ता. १० (वार्ताहर ) : कल्याण तालुका पोलिस ठाण्याने ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी ‘फिरते पोलिस ठाणे’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. धोंडोपंत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. गावोगावी पोलिस सेवा घेऊन जाणे आणि पोलिसांबद्दलचा विश्वास वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश शिंदे आणि कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकाऱ्यांचे पथक ‘फिरत्या डिजिटल व्हॅन’च्या माध्यमातून गावागावात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक तक्रार नोंदणी व्यवस्था आहे. नागरिकांच्या समस्या त्यांच्या घरी जाऊन ऐकल्या जात आहेत. नागरिकांनी केलेल्या तक्रारी तत्काळ नोंदवून त्यावर त्वरित उपाययोजना केली जात आहे.
फिरत्या पोलिस ठाण्याच्या माध्यमातून कायद्याविषयी जनजागृती केली जात आहे. नव्या कायद्यांची माहिती, महिलांची सुरक्षितता, बाल लैंगिक शोषणाविरोधातील उपाय, समाजमाध्यमांचा योग्य वापर आणि ट्रॅफिक नियमांचे महत्त्व यावरही माहितीपट दाखवले जात आहेत.इंस्टाग्राम सारख्या समाजमाध्यमाचा सुरक्षित वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन दिले जात आहे. तसेच गावातील तरुण-तरुणींनी छेडछाड झाल्यास काय करावे, कुणाला संपर्क साधावा याबाबतही माहिती दिली जात आहे.
सकारात्मक प्रतिसाद
विशेषतः आदिवासी वस्ती, वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेण्यावरही भर दिला जात आहे. त्यांच्याकडून तक्रारी घेतल्या जात आहेत. त्यावर त्वरित कारवाई केली जात आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये कायदा आणि पोलिसांविषयी जागरूकता वाढत आहे, तसेच पोलिसांची प्रतिमा जनतेच्या मनात अधिक सकारात्मक होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले असून, ‘पोलिस आता आमच्या दारी आले आहेत’ अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. गावकऱ्यांचे पोलिस यंत्रणेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. त्यांच्यात पोलिसांविषयी नव्याने विश्वास निर्माण होत आहे.
पोलिसांची सेवा अधिक लोकाभिमुख
कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या या उपक्रमाची दखल घेत ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. स्वामी यांनीही समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी फिरत्या पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा उपक्रम ग्रामीण भागातील लोकांना कायद्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम करतो आहे. भविष्यात पोलिसांची सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आदर्श ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.