

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : सूर्या पाणी योजनेतून मिरा-भाईंदरला आगामी नोव्हेंबरपर्यंत पाणी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी (ता. ९) या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. योजनेतील नागरी काम आगामी दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे; परंतु योजनेला आवश्यक असलेला १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठ्यास होत असलेला विलंब मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा सुरू होण्यात मोठा अडथळा ठरत आहे.
मिरा-भाईंदर शहराला सूर्या पाणी योजनेतून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. ही योजना गेल्यावर्षी कार्यान्वित होणे अपेक्षित होते; परंतु आता या वर्षअखेरीस योजनेतून पाणी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. योजनेअंतर्गत मिरा-भाईंदरला पाणी देण्यासाठी ८५ किमी लांबीची जलवाहिनी अंथरली जात आहे. जलवाहिनी तसेच अन्य स्वरूपाची ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत; परंतु १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा होण्यास विलंब होत असल्याने प्रत्यक्ष पाणी मिळण्यास नोव्हेंबर अथवा डिसेंबर उजाडणार आहे. प्रकल्पाला वीजपुरवठ्यासाठी वीज कंपनीकडून खांब टाकण्यात येत आहेत. त्यातील काही खांब सीआरझेड परिसरात आहेत आणि सीआरझेडची परवानगी अद्याप हाती पडली नसल्याने त्या भागातील खांब टाकण्याचे काम रखडले आहे. यामुळे वीजपुरवठ्याच्या कामाला उशीर होत आहे.
सूर्या नदीतून पाणी उचलण्यासाठी योजनेच्या कवडास येथील उदंचन केंद्रात सहा शक्तिशाली पंप बसविण्यात आले आहेत. मिरा-भाईंदर व वसई-विरार या दोन्ही शहरांच्या पाणीपुरवठ्यासाठी हे पंप बसविण्यात आले आहेत. सहा पंप एकाच वेळी चालण्यासाठी १३२ केव्ही विजेची आवश्यकता आहे आणि पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी स्वतंत्र वाहिनी टाकणे आवश्यक आहे. वसई-विरारची योजना आधी पूर्ण झाल्याने तो पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रकल्पाला तात्पुरता ३३ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यावर दोन पंप चालविले जातात, मात्र सहा पंप एकाचवेळी चालवायचे असल्यास १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठाच आवश्यक आहे. त्यासाठी खांब उभारून स्वतंत्र वीजवाहिनी टाकण्यात येत आहे. हे खांब वन विभाग तसेच सीआरझेड क्षेत्रात आहेत. वन विभागाची परवानगी मिळाली, परंतु सीआरझेड विभागाची परावनगी अद्याप मिळालेली नाही. वीजपुरवठा ऑक्टोबरपर्यंत सुरू झाला तरच बाकी सोपस्कार पार पाडून डिसेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील पाणी देणे शक्य होणार आहे, असे एमएमआरडीएच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
समितीअभावी नामुष्की
सीआरझेडची परवानगी मिळण्यासाठी आवश्यक असलेली समिती अद्याप स्थापन झालेली नाही. त्यामुळे परवनागी मिळण्यास विलंब होत आहे. समिती नसल्याने सध्या परवानगीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे ही परावनगी मिळाल्यानंतरच सीआरझेड भागातील खांब टाकण्यास गती मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ही परवानगी कधी मिळते, यावर प्रकल्पाचा वीजपुरवठा अवलंबून असणार आहे.
वीजपुरवठ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याची मागणी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. त्यानुसार लवकरच ही बैठक होऊन कामाला गती मिळेल.
- नरेंद्र मेहता, आमदार
खांब टाकण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. सीआरझेडची एखादी परवानगी शिल्लक असल्यास त्यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.