सेन्सॉर बोर्डाकडून जातव्यवस्था मजबूत

सेन्सॉर बोर्डाकडून जातव्यवस्था मजबूत
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० ः ‘महात्मा फुले’ हा चित्रपट २५ एप्रिलला देशात प्रदर्शित होत आहे, पण काही घटकांकडून चित्रपटाला विरोध होत असल्याने नवा वाद सुरू झाला आहे. या माध्यमातून सेन्सॉर बोर्डाने नेहमीच्या सवयीनुसार जातव्यवस्था अधिक मजबूत केल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमातून केली आहे.
‘महात्मा फुले’ हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, पण विरोधामुळे आता हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असल्याची माहिती निर्माते-दिग्दर्शकांनी दिली असल्याचे आमदार आव्हाड यांनी दिली. यानिमित्ताने घराघरात जातीय व्यवस्था, कर्मकांड आणि ब्राम्हण्यवादाची चर्चा सुरू झाली. बहुजनांनो तुमच्यावर झालेला अन्याय हा इतिहास मार्गदर्शन करीत राहील. त्यामुळे हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. यासाठी सेन्सॉर बोर्डाने आपल्या सवयीनुसार प्रयत्न केल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे.
------------------------------------------------
इतिहास विसरलेलाच बरा...
महात्मा फुले हा चित्रपट कुणा एका जातीच्या विरोधात नाही. तत्कालीन जुलमी समाज व्यवस्थेच्या विरोधात आहे. ही व्यवस्था आजही कायम आहे. वास्तविक, आपल्या पूर्वजांनी त्या काळात जनावरांपेक्षाही वाईट वागणूक भोगली. आता तुम्ही ज्या परिस्थितीत जगत आहात, त्याला येथील मनुवादी, चातुर्वण्य व्यवस्था, जातव्यवस्था कारणीभूत असल्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमधून दिला आहे.
----------------------------------
सत्य नाकारता येत नाही
भारतीय इतिहासात कर्मकांड आणि जातीय व्यवस्थेचे चटके अनेक थोर पुरुषांनाही बसले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारणारे कोण होते, छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येमागे कोणाचा कट होता, याची चर्चा झालीच पाहिजे. आता महात्मा फुले चित्रपटाला विरोध होत आहे. यामुळे झोपलेला बहुजन समाज जागा होईल, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com