

नव्या शैक्षणिक धोरणाने उद्योग क्षेत्राला पाठबळ : मंगल प्रभात लोढा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ब्रिटिशांनी पारंपारिक भारतीय शिक्षण परंपरा उद्धवस्त करून येथील कौशल्य नष्ट केले. त्यामुळे भारतीयांची उद्योगाची मानसिकता संपली. नवे शैक्षणिक धोरण हे उद्योग क्षेत्राला पाठबळ देणारे ठरणार आहे, असा विश्वास उद्योजक, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. विद्याभारती कोकण प्रांत आणि श्री मावळी मंडळ, ठाणे आयोजित महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण आराखडा, नविन शिक्षण धोरण या विषयावर शनिवारी मावळी मंडळाच्या सभागृहात शिक्षण परिषदेचा समारोप लोढा यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण परिषदेत नवीन शैक्षणिक धोरणाला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला.
लोढा पुढे म्हणाले की, शैक्षणिक धोरण शिक्षकांच्या पुढाकारावर अवलंबून असते. जगाच्या पाठीवर भारतीय विद्यार्थी चमकावे या दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे शिक्षण धोरण राबवले आहे. तब्बल सहा वर्षे या धोरणावर अभ्यास केला आणि आता त्याची अंमलबजावणी होत आहे. या धोरणामुळे उद्योजकता विकासाला चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. या परिषदेला आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, राष्ट्रीय सुकाणू समिती सदस्य शेषाद्री डांगे, संघाचे कोकण प्रांत कार्यवाह, शिक्षक, मुख्याध्यापक उत्तम कांबळे, विद्या भारती कोकण प्रांत मंत्री, मुख्याध्यापक संतोष भणगे, मावळी मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर मोरे, ज्येष्ठ शिक्षणज्ज्ञ प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, विद्या भारती कोकण प्रांतचे प्रदीप पराडकर यादी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य : श्रीपाद ढेकणे
नवीन शिक्षण धोरणामुळे शिक्षणाचा ढाचा बदलला असून विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. नवीन आराखड्यात पूर्व प्राथमिक शिक्षणाचाही समावेश झाला आहे. तसेच शिक्षणाला लवचिकता आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी, सुकाणू समिती सदस्य प्रा. श्रीपाद ढेकणे यांनी दिली. नवीन शिक्षण धोरणात प्रामुख्याने तीन ते आठ वर्षे - पायाभूत स्तर , आठ ते ११ वर्षे पूर्वतयारी स्तर , ११ ते १४ वर्षे पूर्व माध्यमिक स्तर तर १४ ते १८ वर्षे माध्यमिक स्तर यांचा समावेश आहे. या शिक्षणात कृतीयुक्त शिक्षणावर भर देण्यात आला आहे. अशी माहिती ढेकणे यांनी यावेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.