जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून ३३ लाखांची पाईपचोरी

जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून ३३ लाखांची पाईपचोरी

Published on

जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून ३३ लाखांची पाइपचोरी

कल्याण, ता. ६ (बातमीदार) : एमआयडीसीच्या अंबरनाथजवळील जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून तब्बल ३३ लाख ५६ हजार रुपये किमतीचे सहा अत्यंत मोठे पाइप चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यातील गंभीर गोष्ट म्हणजे एमआयडीसीच्या प्रतिबंधित व संरक्षित क्षेत्रातून हे पाइप चोरीला गेले आहेत. येथे ३६ सुरक्षा रक्षकांसह एका पोलिसाचीही सुरक्षेसाठी नेमणूक केलेली असते. इतकी सुरक्षित जागा असतानादेखील चोरट्यांनी एवढे मोठे व महागडे पाइप कसे चोरले, हा प्रश्न विचारला जात आहे.

केंद्रात गेल्या काही दिवसांपासून नवे मोठे पाइप टाकण्याचे काम सुरू होते; मात्र यातील मोठमोठे असे सहा पाइप अचानक चोरीला गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. यात नऊ लाख ३६ हजार किमतीचे व दोन हजार ४०० मिलीमीटर व्यासाचे तीन मीटर लांबीचे तसेच १६ मिलीमीटर जाडीचे दोन पाइप, २४ लाख २० हजार रुपये किमतीचे एक हजार ८०० मिलीमीटर व्यासाचे तसेच १२ मीटर लांबीचे आणि १२ मिलीमीटर जाडीचे चार पाइप चोरीला गेले आहेत. असे एकूण ३३ लाख रुपये किमतीचे पाइप चोरीला गेले आहेत.

कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जांभूळ तसे अंबरनाथपासून अधिक जवळ आहे. बारवी धरणातून आलेले पाणी या केंद्रात शुद्ध केले जाते. या शुद्ध झालेल्या पाण्यामार्फत ठाणे जिल्ह्यातल्या ५० लाखांहून अधिकांची तहान भागवली जाते. त्यामुळे हे केंद्र अत्यंत संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले असून, इथे सामान्यांना विनापरवानगी प्रवेश निषिद्ध आहे. तसेच या केंद्रात जर प्रवेश करायचा असेल, तर अंबरनाथजवळील फॉरेस्ट नाक्यावरील प्रवेशद्वारावरून आत जावे लागते. आत गेल्यावरदेखील दोन सुरक्षा रक्षकांच्या चौक्या लागतात. त्यामुळे इथली सुरक्षा भेदणे हे अवघड मानले जाते.

प्रतिबंधित क्षेत्रासाठी एमआयडीसी प्रशासनाची मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. अशा स्थितीत सुमारे साडेसात फूट व्यासाच्या अवजड महाकाय जलवाहिन्या चोरीला जाताना कुणीच कशा पाहिल्या नाहीत, असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. तसेच त्या वाहिन्या कापून नेल्याचे म्हटले जात आहे. तर त्या कुणी कापल्या, त्याचा आवाज कुणी ऐकला कसा नाही? तसेच या वेळी सुरक्षा रक्षक नेमके काय करत होते? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एमआयडीसीकडून गुन्हा दाखल
दरम्यान, याबाबत एमआयडीसीचे अंबरनाथचे कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, “पाइपचोरीची घटना खरी असून, त्याप्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. यामागे पोलिस तपास पूर्ण झाला की, सत्य बाहेर येईल. दरम्यान, यात तिथले सुरक्षा रक्षक दोषी आढळले, तर त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com