

आरपीएफ जवानाने वाचविला प्रवाशाचा जीव
‘एलटीटी’ रेल्वेस्थानकावरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : लोकमान्य टिळक टर्मिनसवर धावत्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये चढताना एक प्रवासी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत पडत असताना कर्तव्यावर असलेल्या रेल्वे जवानाने प्रसंगावधान दाखवून या प्रवाशांचा जीव वाचवला. शुक्रवारी (ता. ३०) घडलेली ही घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून आरपीएफ जवान राम नारायण सिंह यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसच्या फलाट क्रमांक चारहून एलटीटी-कोचुवेली गरीब रथ एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेत सुरू झाली; तेव्हा एक प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होता; याचदरम्यान या प्रवाशाचा तोल गेला आणि तो फलाटावर कोसळला. तेव्हा कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान राम नारायण सिंह यांनी या प्रवाशाकडे धाव घेत एक्स्प्रेससोबत घसरत जाणाऱ्या या प्रवाशाला उचलून बाजूला खेचले. हा प्रवासी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत पडताना वाचला; त्यामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले आहे. दरम्यान, आमचे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर आणि सतर्क असतात. अनेकदा आपला जीव धोक्यात घालून आजपर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. राम नारायण सिंहने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका प्रवाशाचा प्राण वाचला आहे; आम्ही या जवानाचा सत्कार आणि गौरव करणार आहोत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.