

आमदारांनी घेतला प्रशासनातील कामकाजाचा आढावा
कर्जत, ता. १ (बातमीदार) ः कर्जत-खालापूर मतदारसंघातील सर्व विभागांच्या समन्वयातून नागरिकांच्या गरजा समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवनात एक महत्त्वपूर्ण आपत्कालीन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे प्रभावी समन्वय साधण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. बैठकीचे समन्वयन तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी केले. दर महिन्याला अशी बैठक घेऊन प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे बैठकीच्या शेवटी सांगण्यात आले. या वेळी आमदार थोरवे म्हणाले, ‘‘समाजात सध्या अपप्रचार आणि शंका पसरवणारे प्रयत्न सुरू आहेत. अनेक अधिकाऱ्यांवर अनावश्यक दबाव आणला जातो, मात्र अशा दबावाला बळी पडू नका. आपल्या मतदारसंघात अशा प्रकारांना थारा नाही. शासन आणि प्रशासन एकत्र आल्यासच विकासाला गती मिळते. आपण सर्वांनी टीमवर्कच्या माध्यमातून काम केल्यास सकारात्मक बदल शक्य आहे.’’ तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही आमदारांनी या वेळी दिली. यासाठी स्थानिक स्तरावर प्रत्येक विभागाने समन्वय साधून प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. उपविभागीय अधिकारी डी. डी. टेळे, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड, माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, वन अधिकारी समीर खेडेकर, सहाय्यक निबंधक शरयू सामंत, महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे आदी उपस्थित होते.
........................
पावसाळी पर्यटन बंद करू नका
लेक लाडकी योजनेत ४९९ पैकी ४७१ मुलींना लाभ मिळाला असून, ४५ अंगणवाड्यांना स्वतःची जागा नाही, अशी माहिती भारती साताळकर यांनी दिली. गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी ३५५ शाळा १६ जूनपासून सुरू होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन गोदामात तीन महिन्यांचे धान्य साठवले जाणार असल्याचे तहसीलदार जाधव यांनी सांगितले. आगार व्यवस्थापक दयानंद मोरे यांनी १० नव्या बसची गरज व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नवीन मार्गावर सेवा सुरू करणे अडचणीचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. भिसेगाव येथे प्रवासी निवाऱ्याची मागणीही करण्यात आली. भूमी अभिलेख विभागकडून मोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळ अपुरे असल्याचे सांगण्यात आले. वन विभागाकडून पळसदरी भागात दरडी कोसळण्याचा धोका असून पावसाळ्यापूर्वी त्या हटवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. या वेळी संबंधित मागण्यांबाबत आमदार थोरवे यांनी सकारात्मकता दाखवत लवकरच सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार लाडिवली येथील डम्पिंग ग्राउंड परिसरात वनउद्यान उभारण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळी पर्यटन बंद न करता, सुरक्षिततेच्या उपाययोजना करून ते सुरू ठेवावे, अशी सकारात्मक भूमिका आमदारांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.