पुर्नवसनाची प्रतीक्षेत रहिवाशी मृत्यूच्या खाईत

पुर्नवसनाची प्रतीक्षेत रहिवाशी मृत्यूच्या खाईत

Published on

पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत रहिवासी मृत्यूच्या खाईत
नेरूळमध्ये स्लॅब कोसळला; धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १ ः सिडकोनिर्मित इमारतींच्या पुनर्वसनाचे प्रकल्प रखडल्‍याने याठिकाणी वास्‍तव्य करणाऱ्या कुटुंबांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.
नेरूळ येथे मोडकळीस आलेल्या विश्वशांती सोसायटीचे रखडलेले पुनर्वसन रहिवाशांच्या जीवावर बेतले आहे. शनिवारी (ता. ३१) पहाटे एका घरातील स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत दोन वृद्ध महिला थोडक्यात बचावल्या; मात्र या घटनेमुळे अतिधोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची नावे घोषित केली जातात. त्यापैकी अतिधोकादायक म्हणजे सी-वन प्रकारात मोडणाऱ्या इमारतींना तत्काळ रिकामी करण्याचे आदेश देण्यात येतात; परंतु महापालिकेच्या आदेशाला नेहमी केराची टोपली दाखवली जाते. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा नसल्याने येथील कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत असतात.
नेरूळ येथे सिडकोने निर्माण केलेली ई-वन प्रकारातील विश्वशांती सोसायटीच्या रहिवाशांनाही पुनर्वसन प्रकल्प रखडल्याचा फटका बसला आहे. दीड वर्षांपूर्वी इमारती जुन्या आणि जीर्ण झाल्याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी इमारतींचे पुनर्वसन करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. त्यानुसार खासगी विकसकाची निवड केली होती. या वेळी विकसकाने इमारत रिकामी करून भाड्याने राहण्यास तयार असणाऱ्यांना घरभाडे, साहित्य वाहतुकीचे पैसे देण्यास होकार दर्शवला. ज्या लोकांनी घरे रिकामी केली, अशा लोकांना भाडेही दिले.
दरम्यान, महापालिकेने इमारतीला अतिधोकादायक घोषित करून इमारतीची वीज, नळजोडणी आणि मलनिस्सारण बंद करण्याची नोटीस बजावली. तसेच दुसरीकडे जुन्या सोसायटी पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने निवडणूक होऊन त्यांच्या जागेवर दुसऱ्या पदाधिकाऱ्यांची समिती निवडून आली. नव्या समितीने पुनर्वसन प्रकल्पाबाबत विकसकासोबत मतभेद झाल्याने त्यांनी पुनर्वसनाला विरोध केला आहे. तसेच सोसायटीचे पुनर्वसन करण्यासाठी नवीन विकसकाचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे अजूनही काही रहिवासी मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये वास्तव्याला आहेत. तर बाहेर पडलेले रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. या दोन समितींच्या वादात विकसक शोधणे आणि पुनर्वसनाचा प्रकल्प मार्गी लावणे, ही दोन्ही कामे रखडल्याने इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे.

अतिधोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य
विश्वशांती सोसायटी पूर्वी ओनर्स अपार्टमेंट असोसिएशन नावाने स्थापन झाली आहे. पुनर्वसन प्रकल्पाकरिता या संस्थेचे विश्वशांती गृहनिर्माण सहकारी सोसायटीमध्ये स्थापना झाली. अल्प उत्पन्न गटातील असणाऱ्या सोसायटीत एकूण सात इमारती आहेत. इमारतींमध्ये २१० सदनिका आहेत. त्यापैकी ५३ सदनिका रहिवाशांनी रिकाम्‍या केल्‍या असून अद्याप १५७ सदनिकांमध्ये कुटुंब वास्तव्याला आहेत.


विश्वशांती सोसायटी अतिधोकादायक प्रकारात मोडत असल्याने रहिवाशांना तत्काळ घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. शनिवारी झालेल्या दुर्घटनेनंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना विभाग कार्यालयात बोलावले होते. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महापालिकेकडून मुदतवाढ मागितली आहे. तरी महापालिकेतर्फे लवकरच वीज, पाणी आणि मलनिस्सारण वाहिन्या बंद करण्यात येणार आहेत.
- सोमनाथ पोटरे, उपायुक्त, परिमंडळ १

आम्ही सर्व नागरिक अतिशय वाईट परिस्थितीत राहत आहोत. जुन्या व नवीन समितीच्या वादात पुनर्वसन रखडलेले आहे. आतापर्यंत ५३ सदनिकांनी घरे रिकामी केली आहेत. उर्वरित घरांमध्ये लोक वास्तव्याला आहेत.
- राजाराम ठाकूर, सदस्‍य, विश्वशांती गृहनिर्माण सोसायटी, नेरूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com