

रिक्षातून अमली पदार्थांची तस्करी
४४ हजार किमतीचे एमडी, सहा किलो गांजा जप्त
कल्याण, ता. ११ : चरस, गांजा, एमडीसारख्या पदार्थांची विक्री करणाऱ्या ड्रग्ज तस्करांविरोधात कल्याण-डोंबिवलीतील विविध पोलिस ठाण्यांसह डीसीपी स्कॉडने मोहीम तीव्र केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने कारवाई सुरू असून, मंगळवारी (ता. १०) दोन विविध ठिकाणांहून एका एमडी तस्करासह दोन गांजा तस्करांना अटक केली आहे. फैजल शेख, अफसर शेख अशी दोन गांजा तस्करांची नावे आहेत, तर अब्दुल शेख असे एमडी तस्कराचे नाव आहे. अब्दुल शेख यांच्याकडून ४४ हजार किमतीच्या एमडी ड्रग्ज जप्त केला आहे. फैजल शेख व अफसर शेख या दोघांकडून तब्बल तीन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या तिघांनी हे अमली पदार्थ कुठून आणले, कुणाला विक्री करणार होते, याचा तपास पोलिस करत आहेत.
ऑक्टोबर २०२४ ते मे २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत कल्याण-डोंबिवली पोलिसांनी लाखोंचे अमली पदार्थ जप्त केले आहेत, तर ५० गुन्हे दाखल करत याप्रकरणी ६५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी कल्याण डीसीपी स्कॉड आणि टिळक नगर पोलिसांना ९० फीट रोड कचोरे परिसरात एका व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत अब्दुल शेख याला अटक केली आहे. अब्दुलकडून २२ ग्रॅम वजनाचा सुमारे ४४ हजार रुपये किमतीचा एमडी जप्त केला आहे. अब्दुल हा रिक्षाचालक असून, त्याने एमडी ड्रग्ज कुठून आणले, तो कोणाला विक्री करणार होता याचा तपास आता पोलिस करत आहेत.
दुसरीकडे कल्याण एसीपी स्कॉडची गस्त सुरू असताना कल्याण पश्चिमेकडील चिकन घर परिसरात होली क्रॉस शाळेच्या पाठीमागील मैदानात एका रिक्षात दोघे जण बसले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या दोघांना हटकले असता या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. डीसीपी स्कॉडच्या पथकाने पाठलाग करत या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या रिक्षामध्ये तब्बल सहा किलो वजनाचा तीन लाख रुपये किमतीचा गांजा सापडला. पोलिसांनी तत्काळ फैजल शेख आणि अफसर शेख या दोघांना ताब्यात घेतले असून, गांजाचा साठा जप्त केला. दरम्यान, एका शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मैदानात सुरू असलेल्या या प्रकारामुळे हे दोघे हा गांजा तस्कर तरुण-तरुणीसह विद्यार्थ्यांना विक्री करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.