प्रभाग रचनेकडे नागरिकांचे लक्ष

प्रभाग रचनेकडे नागरिकांचे लक्ष
Published on

पंढरीनाथ कुंभार
भिवंडी, ता. ११ : विधानसभा निवडणुकीनंतर प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या हालचालीला राज्याच्या प्रशासकीय पातळीवरून सुरुवात झाली आहे. ‘ड’ वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश भिवंडी महापालिकेला बुधवारी (ता. ११) मिळाले आहेत. त्यानुसार पालिकेच्या निवडणुक कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भिवंडी-निजामपूर ही ‘ड’ वर्ग महापालिका आहे. २०११ मध्ये केलेल्या शहराच्या जनगणनेनुसार पालिका क्षेत्रातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे सात लाख नऊ हजारांपेक्षा जास्त आहे; मात्र गेल्या १४ वर्षांत शहरातील लोकसंख्या वाढली आहे. तसेच नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार नागरिकांना अपेक्षित मूलभूत सुविधा मिळत नाही, तर काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेल्या १० वर्षांत सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून घेतला; मात्र महापालिका ‘क’ वर्गामध्ये नेऊ शकले नाही, तर काही लोकप्रतिनिधी ही महापालिका ‘ड’ मध्येच राहावी याच मानसिकतेत असल्याने शहराची स्थिती जैसे थे आहे.

राज्य सरकारने २०२२ मध्ये निवडणूक घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार तीन वॉर्ड सदस्यांचा एक प्रभाग बनविला होता. त्यानुसार अंतिम यादीदेखील तयार करून राज्य सरकारकडे पाठविली होती; मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर हि निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सरकारने महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांनी भिवंडी महापालिका प्रशासनाला प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रत्येक प्रभागात चार सदस्य राहणार आहेत. सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा पाच सदस्यांचा होतील. अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील. तसेच भौगोलिक सलगता राखण्याच्या दृष्टीने प्रभाग रचना करताना नागरिकांची गैरसोय टाळता येईल, अशा ठिकाणी असावेत, असे नमूद केले आहे. तसेच सरकारने दिलेल्या आदेशानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या, सदस्यसंख्या, प्रभागाची संख्या, प्रभाग रचनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे, प्रभागाच्या सीमारेषा, प्रभागाचे गुगल नकाशे आदी बाबत प्रारूप रचनेसाठी सूचना व निर्देश दिले आहेत.

भेटीगाठीला सुरुवात
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यालयात निवडणूक निमित्ताने हालचाली सुरू झाल्या आहेत, मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते आणि पुढारी केवळ भेटीगाठी आणि चर्चेवर भर देत होते.

चार वॉर्ड सदस्यांचा एक प्रभाग
मागील निवडणुकीत भिवंडी महापालिकेचे एकूण ९० नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये ४५ पुरुष व ४५ महिला नगरसेविका यांचा समावेश होता. त्या वेळी एकूण चार वॉर्ड सदस्यांचा एक प्रभाग होता. त्यामुळे २१ प्रभाग चार सदस्यांचे आणि दोन प्रभाग तीन सदस्यांचे होते. आता प्रभाग रचना नव्याने होणार असल्याने सत्तेचे गणित मांडणाऱ्या अपक्ष नगरसेवकांच्या आणि राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या उमेदवारांना या निवडणुकीत चांगलाच फटका बसणार असल्याचे दबक्या आवाजात म्हटले जात आहे.

सध्या प्राथमिक स्थितीत जनगणनेनुसार शासनाकडून प्रभाग रचना करण्याचे आदेश आले आहेत. निवडणूक निमित्ताने एकूण कार्यक्रमाचा तारखेनुसार प्रारूप व अंतिम यादी व प्रभाग जाहीर करण्याचा आराखडा सरकारकडून आलेला नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे शासनाचे आदेश उपलब्ध होतात. त्यानुसार कामाची सुरुवात झालेली आहे.
-अजित महाडिक, निवडणूक विभाग अधिकारी, भिवंडी महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com