अंबरनाथमध्ये रेल्वे रुळातून जीवघेणा प्रवास सुरूच
अंबरनाथकरांचा रेल्वे रुळातून जीवघेणा प्रवास!
शीतल मोरे; सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. १५ : बी केबिन येथील मोरवली पाड्यात रेल्वेची भिंत क्रॉस करून नागरिकांचा जीवघेणा प्रवास अद्याप सुरू आहे. याच ठिकाणी अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या या परिसरात रेल्वे रूळ आहे. या रुळालगत पूर्वेला निसर्ग ग्रीन ही उच्चभ्रूंची सोसायटी तर पश्चिमेला झोपडपट्टी वसली आहे. त्यामुळे येथील नागरिक वेळ वाचवण्यासाठी हा रूळ ओलांडून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. दरम्यान, लोकलचा अंदाज न आल्याने येथे अनेकदा अपघात होतात. रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टीने येथे संरक्षक भिंत घातली होती; मात्र नागरिकांनी ही भिंत पुन्हा तोडून प्रवास सुरू ठेवला आहे. यासंदर्भात रेल्वे संघटनेने अनेकदा या ठिकाणी सुरक्षेची मागणी केली. तसेच या ठिकाणी उड्डाणपुलाचीही मागणी केली होती; मात्र रेल्वेकडे आर्थिक तरतूद नसल्याने ही मागणी गेली कित्येक वर्षे खितपत पडली आहे.
वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकीकारणामुळे अंबरनाथ शहराच्या लोकसंख्येत मागील काही वर्षांत भरमसाठ वाढ झाली आहे. औद्योगिकीकारणामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी नागरिकांचा लोंढा शहरात येत आहे. यातील कर्जत, नेरळ, शेलू, वांगणी या ग्रामीण भागातून तसेच अगदी ठाणे, कल्याण असा अप-डाऊन मार्गाचा प्रवास करून रोज येतात. त्यामुळे एकमेव वाहतुकीचे साधन असलेल्या मुंबईची लाइफलाइन म्हणून प्रचलित असणाऱ्या या लोकल सेवेला उपनगरीय भागातही पहिले प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शहरात येण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या या लोकलला जीवघेणी गर्दी पाहायला मिळते.
प्रत्येकाला वेळेवर कामावर पोहोयचे असते, तर काहींना उपचारासाठी जायचे असते. अशा काही कारणांमुळे नागरिक लोकलने प्रवास करतात; मात्र अनेकदा लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस, मालगाडी यामुळे रोजच्या धावणाऱ्या लोकल उशिराने धावतात. त्यामुळे गर्दीच्या प्रमाणात दुप्पट वाढ होत असते. प्रत्येकाला घाई असल्यामुळे वारंवार जनजागृती करूनही नागरिक लोकला लटकून प्रवास करताना दिसतात.
लोकल सेवेत एक तासाचे अंतर
अंबरनाथ स्थानकावरून सुटणारी लोकलसेवा ही स्लो असल्याने नागरिक जलद गाड्यांना म्हणजेच कर्जत ते सीएसटी, खोपोली ते सीएसटी, सीएसटी ते कर्जत, सीएसटी ते खोपोली या जलद धावणाऱ्या ट्रेनने प्रवास करण्याला पसंती देतात. दरम्यान, या लोकल सेवेत एक तासाचे अंतर असल्याने या जलद गाड्यांच्या लोकल वाढवण्याची आणि लोकलचे डबे वाढवण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांत होत आहे; परंतु लोकल सेवेत वाढ न झाल्याने अपघात वाढले आहेत. अनेकदा हे अपघात अंबरनाथ फलाटावरच झाले आहेत. प्रत्येकाला धावती ट्रेन पकडून बसायला जागा पकडायची असते, तर अनेकांना उतरायची घाई असते. या नादात हे जीवघेणे अपघात झाल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.
अपघाताचा स्पॉट आणि उपाययोजना
१) अंबरनाथच्या बी केबिन येथील मोरवलीपाडा येथे अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली होती. या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगमुळे अपघात झाल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेच्या निदर्शनास आले होते. या परिसरात फाटक अथवा ब्रिज झाल्यास अपघातावर आळा बसू शकतो.
२) या ठिकाणी रेल्वेने सुरक्षा रक्षक नेमण्याची मनसे आंदोलकांची मागणी होती. या मगणीनंतर रेल्वेने या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून रात्रंदिवस गस्त वाढवली आहे.
३) अनुचित प्रकार टाळण्यासाठी येथे सीसीटीव्ही बसवले आहेत. तसेच या ठिकाणी संरक्षक भिंतही बांधण्यात आली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार उड्डाणपुलाचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे.
................................................
कळवा-पारसिक बोगद्याचा रेल्वे ट्रॅक धोक्याचा
रेल्वे प्रशासन उपाययोजना करण्यात अपयशी
किरण घरत; सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. १५ : पाच दिवसांपूर्वी मुंब्रा स्थानकाजवळ प्रवाशांच्या गर्दीमुळे लोकल डब्यातून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. त्याचबरोबर शुक्रवारी (ता. १३) रात्री घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढताना लोकल व फलाटातील अंतरात पाय अडकून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. गेल्या काही वर्षांत मध्य रेल्वे मार्गावर लोकलमधून पडून हजारो प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेच्या मुंब्रा, दिवा, कुर्ला, कळवा, कोपर, कुर्ला, कल्याण रेल्वे स्थानक, तर पश्चिम रेल्वेच्या वसई, बोरिवली, दहिसर, जोगेश्वरी आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वडाळा ही स्थानके अपघातांची हाॅटस्पाट ठरली आहेत. तर मध्य रेल्वेच्या मार्गावरील मुंब्र्यापाठोपाठ कळवा पारसिक बोगद्याच्या पुढचा व मागचा रेल्वे ट्रॅक अतिशय धोक्याचा ठरला आहे. मागील काही वर्षांत या भागात अनेक प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे; तर अनेक जण जखमी झाले आहेत.
कळवा स्थानकाच्या पुढे पारसिक बोगद्याच्या अलीकडे आणि पुढे दोन्ही बाजूंना असलेल्या अप आणि डाऊन मार्गावर, वळणावर तसेच मुंब्रा स्थानक सोडल्यावर दिवा स्थानकाच्या दिशेने दोन्ही अप आणि डाऊन वळणावर प्रवासी गाड्या धावत असतात, तेव्हा अतिरिक्त प्रवासी भारामुळे गाडी झुकते तसेच प्रवाशांच्या रेट्यामुळे दरवाजात व आतील बाजूस उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन ते डब्याबाहेर फेकले जातात. त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी होतात. त्यात गेल्या काही वर्षांत अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा मारुती पाटील यांनी २ फेब्रुवारीला मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना पत्र लिहून ही परिस्थिती आपल्या पत्रातून मांडली होती; मात्र रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
रेल्वे मार्गावर अनेक धोकादायक ठिकाणे आहेत. त्यावर उपाययोजना करण्यास रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.
...तर दुर्घटना घडली नसती
दिवा ते कळवा या धीम्या मार्गावरील रेल्वे ट्रॅकवरून जलद लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक करू नये. जलद गाड्यांमुळे लोकल गाड्यांना थांबावे लागते. त्यामुळे उशीर झाल्यावर ठरावीक अंतर गाठण्यासाठी गाडीचा वेग वाढवावा लागतो. परिणामी मोठ्या प्रमाणात अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी मुंबई उपनगर रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता; मात्र रेल्वे प्रशासनाने त्याकडेही दुर्लक्ष केले. जर या पत्राची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असती तर मुंब्र्यातील दुर्घटना रोखण्यास मदत झाली असती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.