कोट
रेल्वेकडून समस्यांकडे वारंवार डोळेझाक केली जात आहे. रेल्वे संघटनांच्या सूचनांचे सोडा, खासदारांनी सुचवलेल्या सूचनांनाही केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला मुंबईकरांच्या जीवाशी काही घेणे-देणे नाही.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघ
...................
१५ वर्षांपासून कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ अपघाताचे प्रमाण अधिक होते. तीच परिस्थिती काही वर्षांपासून ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान दिसत आहे. या ठिकाणी गर्दी वाढली आहे. त्यातच दिवा ते मुंब्रा हे अंतर सहा मिनिटांचे आहे. तसेच कल्याणहून सीएसटी जाणाऱ्या लोकल गर्दीने तुडुंब भरून डोंबिवली, दिवा स्थानकात येतात. बहुतांशी प्रवाशांना बऱ्याच वेळा लटकत प्रवास करावा लागतो.
- सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा रेल्वे प्रवासी संघटना
.........................
मुंब्रा ते दिवादरम्यान झालेल्या रेल्वे अपघातामुळे जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल डेथलाईन होईल असे वाटले नव्हते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने किमान सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस लोकल गाड्यांना प्रामुख्याने प्राधान्य द्यावे. शिवाय ठाणे-कल्याण, दिवा-सीएसटी अशा लोकल गाड्यांची संख्या वाढवावी. रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या घरीही त्यांचे आई-वडील, पत्नी-मुले ही मंडळी त्यांची वाट पाहात असतात.
- गौरव वालावलकर, प्रवासी
.....................
अपघाताची घटना ऐकून रेल्वे प्रवास इतका जीवघेणा होऊ शकतो का, असाच प्रश्न पडू लागला आहे. सकाळ आणि संध्याकाळी हा प्रवास ठाण्याच्या पल्याड नकोस वाटतो, पण पर्याय नसल्याने तो करावा लागतो. आता तरी रेल्वे प्रशासनाने लोकल संख्या वाढवावी.
- ऋषिकेश यादव, प्रवासी
..........................
आम्ही बऱ्याच वेळा रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन रेल्वे स्थानक परिसरातील डेडस्पॉटबद्दल माहिती देतो. तसेच उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बरेच अपघात हे प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अनेक ठिकाणी प्रवासादरम्यान लोकल चालू असताना एका बाजूला झुकते. या ठिकाणाबाबतदेखील रेल्वे प्रशासनाला माहिती दिली आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे अन्यथा अपघातांचे सत्र थांबणे कठीण आहे.
- राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटना
................................
फलाट क्रमांक १वर कर्जत दिशेने जाणाऱ्या ट्रेनच्या महिला डब्याच्या समोरचे वळण अत्यंत धोकादायक आहे. संध्याकाळच्या वेळी गर्दीत उतरताना प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने अनेक महिला खाली पडतात. मागच्या प्रवाशांच्या धक्क्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. विशेषतः वृद्ध महिला आणि लहान मुलांबरोबरच्या मातांना याचा अधिक त्रास होतो. हे ठिकाण डेडस्पॉटच झाले आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित त्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी आणि प्रकाशव्यवस्था सुधारावी. एखादा मोठा अपघात होण्याआधीच उपाय करावेत.
- ॲड. प्रशांत चंदनशिव
................
मी पाठवलेल्या पत्राची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली असती तर मुंब्र्यात झालेला अपघात रोखता आला असता.
- आनंदा पाटील, उपाध्यक्ष, मराठी एकीकरण समिती
.........................
पारसिक बोगद्याजवळ अनेक वेळा रेल्वे अपघात होतात. त्यामुळे त्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात.
- अस्लम शेख, प्रवासी, मुंब्रा,
....................
मी नेरळ ते उल्हासनगर असा रोजचा जीवघेणा प्रवास करते. वांगणीपर्यंतचा प्रवास सुखकर वाटतो; मात्र बदलापूर आणि अंबरनाथ या दोन स्थानकांवर रोजच हाणामारी होते. त्यात आम्हा ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होतात. कर्जतवरून सीएसटीकडे धावणाऱ्या लोकल कमी आहेत. त्यामुळे दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने कर्जत ते सीएसटी अशा लोकल फेऱ्या वाढल्या पाहिजेत. तसेच रेल्वेने सुरक्षा यंत्रणेत वाढ करावी.
- अमिता गायकवाड, महिला प्रवासी
...........................
दुचाकी आणि चारचाकीमध्ये प्रवाशांची संख्या ठरवून दिली असून, अतिरिक्त प्रवासी बसल्यास चलन कापले जाते; मात्र लोकलच्या प्रवासात प्रवाशांना मोठ्या प्रमाणात तिकीट दिले जाते. त्यामुळे जिथे एका लोकलमध्ये सहा हजार प्रवाशांची क्षमता असते, तिथे तीस हजार प्रवासी एका लोकलमध्ये कोंबले जातात. तसेच अंबरनाथमध्ये पूर्वी १० लोकल धावत होत्या. आता वाढती लोकसंख्या पाहता अतिरिक्त लोकल असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सीएसटी ते कर्जतदरम्यान लोकल येत असताना त्या कल्याणपर्यंत वेळेवर येतात; मात्र कल्याण याच लोकल कमीत कमी अर्धा तास रोज थांबवल्या जातात.
- स्वप्नील बागूल, प्रवासी
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.