विद्यार्थी वाहतुकीवर करडी नजर
विद्यार्थी वाहतुकीवर करडी नजर
वाहतूक विभाग आणि आरटीओ करणार कठोर कारवाई
ठाणे शहर, ता. १७ (बातमीदार) : शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने आणि अनधिकृत वाहनांतून वाहतूक करणारे चालक पोलिस आयुक्तांच्या रडारवर आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या समितीने याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे निर्देश आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे समितीने तातडीने बैठक घेत अशा वाहतुकीकडे लक्ष देण्याचा सूचना शाळा प्रशासन आणि वाहतूक विभागाला दिल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून वाहतूक करण्यास मनाई असतानाही रिक्षाचालकांकडून असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक उपायुक्तांच्या कार्यालयात समितीची बैठक झाली. त्या वेळी रिक्षावरील कारवाईचे निर्देश देण्यात आले.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. शालेय बस, व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचू नये, यासाठी स्कूलबस सुरक्षितता समिती सतर्क झाली आहे. या समितीने शनिवारी (ता. १४) ठाणे शहर वाहतूक उपायुक्ताच्या कार्यालयाच्या सभागृहात महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला समितीचे अध्यक्ष तथा वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांचे प्रतिनिधी, सचिव आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, सहसचिव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (कल्याण) आशुतोष बारकुल, जिल्हा परिषद, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी कार्यालयांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वाढते रस्ते अपघात आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर धोरण अवलंबिले आहे. विशेषतः बदलापूर येथील शालेय बालकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थी वाहतुकीची नियमावली अधिक सक्षम केली आहे. स्कूलबस सुरक्षितता समितीची स्थापना करून तिच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची काळजी घेतली जात आहे.
रिक्षामधून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर होणार कारवाई
रिक्षामधून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला परवानगी नाही. त्यामुळे अशी वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.
२,४७६ वाहनांना वाहतुकीची परवानगी
ठाण्यात एकूण १,५१६ बस आणि व्हॅनला विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. त्यामध्ये १,२३७ बस आणि २७९ व्हॅनचा समावेश आहे. तर कल्याणात ९५१ बस आणि व्हॅनना विद्यार्थी वाहतुकीची परवानगी आहे. त्यात ७६२ बस आणि १७९ व्हॅनचा समावेश आहे.
शाळांना निर्देश
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी स्वतःची परिवहन समिती स्थापन करावी, १२+१ पेक्षा अधिक आसन क्षमतेच्या वाहनांमध्ये महिला सहवर्तीची नेमणूक बंधनकारक करावी, चालकासह मदतनीसाची चारित्र्य तपासणी महत्त्वाची आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कागदपत्रे विधिसंगत असणे आवश्यक आहे.
सवलतीचा लाभ
स्कूलबस वाहने शालेय नियमानुसार विद्यार्थी वाहतुकीसाठी नोंदणी केली तर अशा वाहनाला वार्षिक फक्त १०० रुपये टॅक्स येतो, इतर वाहनांना तो दहा पट म्हणजे १,००० रुपये येतो. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यायला हवा.
शाळा, पालक समिती, पोलिस, वाहतूक विभागात, शिक्षण विभाग, वाहतूक संघ अशा विविध यंत्रणांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी समिती कार्यरत आहे. यामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या नियमावलीचे कटाक्षाने पालन केले जाते की नाही, यावर समिती लक्ष ठेवते.
- रोहित काटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
...........
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षावरच नव्हे, तर जी वाहने अनधिकृत आणि धोकादायकपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळून येतील, त्यांच्यावर वाहतूक विभागाने प्रादेशिक परिवहन विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.
- पंकज शिरसाट, अध्यक्ष, जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समिती, उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर
फोटो ः रोहित काटकर आणि शाळा व्यवस्थापकांसोबत समितीची बैठक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.