पनवेलमध्ये कोट्यवधींचे भूखंड बळकावले

पनवेलमध्ये कोट्यवधींचे भूखंड बळकावले

Published on

पनवेलमध्ये कोट्यवधींचे भूखंड बळकावले
मृत महिलेला दाखवले जिवंत; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : मृत झालेली महिला जिवंत असल्याचे भासवून तिच्या व मुलाच्या नावे असलेले पनवेल तालुक्यातील धोधाणी, वाघाचीवाडी येथील कोट्यवधी रुपये किमतीचे दोन भूखंड एका टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाकर बंडु नाईक व अंबावी रणछोड पटेल यांच्याविरोधात फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल येथे राहणाऱ्या नीला चंद्रकांत महागावकर यांनी १९७३ मध्ये पनवेल तालुक्यातील धोधाणी येथील वाघाचीवाडी येथे १३.८० गुंठे इतकी जमीन विकत घेतली होती. त्यांचा मुलगा संजय महागावकर यांच्या नावे १९८० रोजी ११ गुंठे इतकी जमीन विकत घेतली होती. यादरम्यान १२ जुलै २००८ रोजी नीला महागावकर यांचा मृत्यू झाला. कामानित्त संजय महागावकर हे कुटुंबासह गुजरात येथे गेल्यानंतर ते २०११ पर्यंत दोन्ही भूखंडाची घरपट्टी गाढेश्वर ग्रामपंचायतीमध्ये नियमित भरत होते. त्यानंतर त्यांचे आपल्या भूखंडाकडे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा उचलत ऑगस्ट २०१५ मध्ये डेरवली गाव येथील प्रभाकर बंडू नाईक याने नीला महागावकर या मृत असताना, त्यांच्या नावाचे बनावट मतदार ओळखपत्र तयार केले आणि इतर महिला उभी करून त्यांच्या नावे असलेली १३.८० गुंठे जमीन प्रभाकर नाईक याने स्वत:च्या नावे केली. त्याचप्रमाणे वाशी येथील अंबावी रणछोड पटेल (वय ४८) याने संजय महागावकर यांचे खोटे मतदार ओळखपत्र तयार करून अन्य व्‍यक्ती उभी करून ११ गुंठे भूखंड स्वत:च्या मालकीच्या हिंगलाज एंटरप्रायझेसच्या नावे करून घेतला. या व्यवहारात बनावट सह्या करण्यात आल्या आहेत. प्रभाकर नाईक याने हा भूखंड १९ सप्टेंबर २०१७ रोजी जनार्दन चांगा पाटील याला विकला, तर त्याने ११ एप्रिल २०१९ रोजी रमेश व संतोष घरत यांना विकला. त्यानंतर त्यांनी १६ मार्च २०२२ रोजी रोचीशनू घोष यांना या भूखंड विकला. सध्या या जमिनीवर रहिवासी इमारत उभी आहे. अंबावी रणछोड पटेल याने संजय महागावकर यांचा बळकावलेला भूखंड ९ सप्टेंबर २०२२ रोजी चेंबूर येथील आदित्य शैलेश सचदेव यांना विकल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून आढळले आहे. सध्या या जमिनीवर बांधकाम सुरू आहे.
---
घोटाळा असा झाला उघड
तक्रारदार संजय महागावकर यांनी जून २०२३ मध्ये पत्नी व मुलाला जमिनीची घरपट्टी भरण्यासाठी पनवेल येथे पाठवले होते. तेव्‍हा त्यांच्या आणि आईच्या नावावरील जमीन दुसऱ्याच्या नावावर असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर महागावकर यांनी गतवर्षी विविध शासकीय कार्यालयातून माहिती अधिकारात व्यवहारातील कागदपत्रे मिळवली असता जमिनी बनावट कागदपत्रांद्वारे बळकावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com