बांबू लागवडीसाठी बदलापुरात नवा प्रयोग
बदलापूर, ता. २२ (बातमीदार) : शहरातील प्रभाग क्रमांक ३०मध्ये प्रथमच पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने नवा आणि सकारात्मक प्रयोग राबवला जात आहे. बदलापूरसारख्या शहरीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या नगराचे हरितक्रांतीने रुपडे पालटण्याचे ध्येय बाळगून या वर्षात दोन हजार बांबूच्या झाडांची लागवड करण्याचा निश्चय भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांनी केला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील ५०० झाडांची लागवड यापूर्वीच करण्यात आली आहे.
बांबू लागवडीचा महत्त्वाचा पैलू म्हणजे भविष्यातील आर्थिक संधींचा विकास. बांबूपासून हस्तकला, लाकूडकाम, जैविक वस्तू तयार करता येतात. ज्यामुळे वाढणाऱ्या या बदलापूर शहरात स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीचा नवा मार्ग खुला होऊ शकतो. त्यातही बांबूची झाडे मुख्यतः सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये आणि सोसायट्यांच्या आजूबाजूला लावण्यात आली आहेत. त्यांना जागा कमी लागते. हे झाड वर्षभरात दोन ते तीन वेळा उत्पन्न देते. त्यात बांबूच्या झाडांची निवड ही पर्यावरणदृष्ट्या फारच उपयुक्त मानली जाते. या झाडांमुळे अधिक ऑक्सिजन तयार होतो, मातीची धूप थांबते, कार्बनडाय ऑक्साइड शोषण होते आणि शहरी तापमान कमी करण्यास मदत होते.
या आगळ्या वेगळ्या अभियानामध्ये बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, उद्यान विभागाचे अधिकारी लवटे यांचा सहभाग लाभला आहे. बदलापूर हरित व्हावे यासाठी या संपूर्ण मोहिमेला प्रशासनाची साथ मिळत आहे. यामुळे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येत आहे. या मोहिमेत स्थानिक युवक, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच शाळांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
हाती घेतलेल्या उपक्रमाचा उद्देश केवळ झाडे लावणे एवढाच मर्यादित नाही, तर झाडांची जोपासना, सतत देखभाल आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवणे, हे या उपक्रमाचे मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे माझ्या परीने ‘आपले झाड, आपली जबाबदारी’ हे ब्रीद सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे.
- संभाजी शिंदे, महामंत्री भाजप, ठाणे जिल्हा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.