एमआयडीसीतील रस्‍त्‍याची कामे संथ गतीने

एमआयडीसीतील रस्‍त्‍याची कामे संथ गतीने

Published on

रोहा, ता. २३ (बातमीदार) ः तालुक्यातील धाटाव एमआयडीसीतील निलिकॉन व एफडीसी कंपनीच्या वळणावर अंतर्गत नाले बांधकामासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. हे काम अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने खड्डा खोदून रस्त्यालगत मातीचा ढिगारा केला आहे. सध्या पावसामुळे रस्‍त्‍यावर माती-चिखल पसरत आहे. त्यामुळे परिसरातील कामगारांची मोठी गैरसोय होत आहे.
औद्योगिक क्षेत्र असल्‍याने रसायन व कंपनीला लागणारे इतर किमती साहित्य वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची या ठिकाणी सतत वर्दळ असते. रस्ता सुस्‍थितीत नसल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. धाटाव एमआयडीसीतील निलिकॉन व एफडीसी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बांधकामासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. सध्या त्यात पावसाचे पाणी भरल्‍याने अपघाताची शक्‍यता वर्तवली जात आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने खड्ड्याच्या अवतीभोवती संबंधित ठेकेदाराने बॅरिकेड लावणे गरजेचे आहे, मात्र ते न लावल्‍याने रात्रीच्या वेळी वाहनचालकाला रस्त्याचा, खड्ड्यांचा अंदाज येत नसल्‍याने कसरत करावी लागते. एखादी मोठी दुर्घटना घडली, तर जबाबदार कोण, असा प्रश्‍न कामगारांसह वाहनचालकांकडून विचारण्यात येत आहे. रखडलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

कायम वर्दळीचा मार्ग
धाटाव एमआयडीसीतील अंतर्गत रस्‍ता कायम वर्दळीचा असून, अनेक गावांना जोडणारा आहे. रस्त्याच्या बाजूलाच निलिकॉन, एफडीसी, मजदा, रोहाडाय असे अनेक कारखाने आहेत, तर पलीकडे किल्ला धाटाव, बारसोली ही गावे आहेत, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस अंशुल, युनिकेम, एक्सेल, एंथिया, सॉल्वे हे कारखाने आहेत. रोठ बुद्रुक, मलखंडवाडी, तळाघर, महादेववाडी या गावांसाठी हा जोड रस्ता आहे. रोज हजारो संख्येने नागरिक, कामगार, शाळकरी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. खोदकामामुळे अपघाताची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

रस्‍त्‍यावर चिखल
महिनाभरापासून एमआयडीसीत अनेक ठिकाणी रस्ते व नाले व गटार कामासाठी खोदकाम सुरू आहे, तर काही कामे अनेक दिवसांपासून बंदावस्‍थेत आहेत. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी जाब विचारल्यानंतर काम पुन्हा सुरू करण्यात आले, मात्र त्यानंतर दोन ते तीन दिवसांत मशिनरी हटवण्यात आली. सद्यःस्‍थितीत काम बंद आहे. पावसाचा जोर वाढताच, नाले, गटारे तुडुंब वाहत असल्‍याने रस्त्यावर पाणी, चिखल पसरतो. वाहनचालकांना तारेवरची कसरत करून मार्गक्रमण करावे लागते. याबाबत धाटाव एमआयडीसीचे उपअभियंता शशिकांत गीते यांच्याकडे विचारणा केली असता, सध्या काम बंद असून, याबाबत माहिती घेतो तसेच प्रत्यक्ष पाहणी करून पावसाने विश्रांती घेताच लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येणार असल्‍याचे सांगितले.

रोहा : धाटाव एमआयडीसीत अंतर्गत रस्‍त्‍याची कामे अपूर्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com