पाऊस

पाऊस

Published on

पाताळगंगा नदीला उधाण
खालापूरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद

खालापूर, ता. २४ (बातमीदार) ः मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत खालापूरमध्ये अतिवृष्टीमुळे पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. जिल्‍ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद खालापूर तालुक्यात १६८ मिलिमीटर एवढी झाली असून त्याखालोखाल माथेरानमध्ये १६५ मिलिमीटर पाऊस पडला. सोमवारी दिवसभर तुरळक पाऊस पडल्यानंतर रात्री दहानंतर पावसाचा जोर वाढला.
खालापूरमधील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. दांड-आपटा या रहदारीच्या मार्गावर झाड पडल्‍याने काही काळ वाहतूक बंद होती. जेसीबीच्या साह्याने झाड बाजूला केल्‍यावर वाहतूक पूर्ववत झाली. खालापूर ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सावरोलीजवळ पाणीपातळी वाढल्‍याने पुलावरून वाहतूक मंदावली होती. राब पाण्याखाली गेल्याने कुजण्याची शक्यता असून दुबार पेरणीच्या संकटाने बळीराजा धास्तावला आहे.

खालापूर ः अतिवृष्‍टीमुळे पाताळगंगा नदीतील पाणीपातळी वाढली आहे.

...............

खालापूरला पावसाने झोडपले
शेतीची कामे खोळंबली

खोपोली, ता. २४ (बातमीदार) ः खोपोली-खालापूर परिसरात तीन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी (ता. २३) संध्याकाळी सुरू झालेल्या धो-धो पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. त्‍यामुळे नोकरदारांची तारांबळ उडाली. शेतीची कामे खोळंबल्‍याने शेतकरी चिंतेत आहेत.
मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पाताळगंगा नदीही दुथडी भरून वाहत असून सोमवारी रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे नदीची पातळी वाढली असती तरी मंगळवारी सायंकाळपर्यंत धोका पातळी ओलांडलेली नव्हती. नदीला आलेला पूर व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयाकडून नदीकिनारी न जाण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे खालापुरातील वाहतूक सेवा तर खोपोलीतील लोकल सेवेवर परिणाम झाला होता.
महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी भरल्याने पनवेल-खोपोली, खोपोली-पाली, खोपोली-पेण वाहतूक काहीशी विस्कळित झाली होती. खोपोली शहरातील रहिवासी भाग व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.

आपत्‍कालीन यंत्रणा सतर्क
शहरातील हनुमान मंदिर पटांगण, डीसीनगर, शास्त्रीनगर, खालची खोपोली परिसरासह अन्य ठिकाणी पाणी तुंबल्याने रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्‍याने आपत्कालीन यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते सतर्क असून, कोणतीही आपत्कालीन घटना किंवा परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ मदतीसाठी सक्रिय आहेत.

खोपोली : पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com