धोकादायक पुलावरून ग्रामस्थांचा प्रवास

धोकादायक पुलावरून ग्रामस्थांचा प्रवास

Published on

कासा, ता. २४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील निकणे गाव आणि परिसरातील १२ पाड्यांसाठी जीवनरेषा ठरलेला अंदाजे १९७५ मध्ये बांधलेला पूल आजही धोकादायक अवस्थेत आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे हजारो ग्रामस्थ संकटात आहेत. गेल्या ५० वर्षांत सातत्याने दुरुस्तीची मागणी करूनही या पुलाकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी, आजही नागरिकांना जीव मुठीत धरून पुलावरून प्रवास करावा लागतो.
दैनंदिन मृत्यूच्या छायेखाली गावकरी या पुलावरून बैल, बैलगाड्या, दुचाकी, पिकअप, ट्रॅक्टर आणि पादचारी प्रवास करतात. या पुलावरून अनेक अपघात घडले आहेत. काही प्रकरणांमध्ये नागरिकांचा मृत्यूही झाला. पुलाची अवस्था इतकी वाईट आहे की तो पावसात हलतो आणि चिखाळलेल्या लाकडी फरशा थेट मृत्यूला आमंत्रण देत असल्याचा अनुभव ग्रामस्थ सांगतात. ग्रामस्थांनी अनेक वर्षांत पूल दुरुस्तीविषयी निवेदने दिली, अर्ज केले. लोकप्रतिनिधींकडून मागण्या केल्या; पण अजूनही ठोस निर्णय झालेला नाही.

पुरामुळे पाच तास गावांचा संपर्क तुटतो
एकच पूल १२ गावांचा आधार आहे. निकणे, घाटाळपाडा, देसकपाडा, सुतारपाडा, गावठणपाडा, दाभीपाडा, इभाडपाडा, वधना-वाकीपाडा, उर्से, म्हसाड, दाभोन सगदेव आणि पेठ या १२ गावांचा संपर्क एकट्या या पुलावर आधारित आहे. मात्र, जोरदार पावसात नदीला पूर आल्यास सलग पाच तासांपेक्षा अधिक वेळ गावांचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, आजारी रुग्ण, गरोदर माता यांना वेळेवर मदत मिळत नाही.


पुलाच्या दुरुस्तीची मागणी
धोकादायक पुलाची तातडीने पाहणी करून नव्या पुलाचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यात पूर आला की, ‘आज कमावतो, आज खातो’ या तत्त्वावर जगणाऱ्या कुटुंबांचे रोजंदारीचे नुकसान होते. वैद्यकीय गरजांमध्ये अडथळा निर्माण होतो. विशेषतः गर्भवती महिला, आजारी वृद्ध आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती जीवावर बेतणारी ठरते आहे. सरकारने लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करावी.

गेल्या वर्षापासून हा पूल जीर्ण झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसात खूप त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा चार-पाच दिवस गावांशी संपर्क तुटतो. यामुळे शाळकरी मुले, रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती करावी किंवा येथे नवीन पूल उभारावा.
- सुदाम मेरे, उपसरपंच, निकणे

निकणे ग्रामस्थांना पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागतो. गावाशी संपर्क तुटल्याने शाळकरी मुले, तसेच कामावर जाणाऱ्यांचा रोजगार बुडतो. आम्ही अनेक वेळा सरकारकडे पुलासाठी मागणी केली आहे.
- सुधीर घाटाळ, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com