घोडबंदर मार्गावरील वेगाला लगाम

घोडबंदर मार्गावरील वेगाला लगाम

Published on

घोडबंदर मार्गावरील वेगाला लगाम
पाच सिग्नलवर वेग नियंत्रण पट्ट्याः प्रायोगिक तत्वावर उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ ः घोडबंदर मार्गावरील अपघातांना निमंत्रण देणाऱ्या भरधाव वाहनांच्या वेगाला आता लगाम घालण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम या मार्गावरील पाच विविध सिग्नलजवळ रम्बल म्हणजेच वेग नियंत्रण पट्ट्या लावण्याचे निर्देश ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर मार्गावरील सर्वच
सिग्नलपाशी त्यांची अंलबजावणी करण्यात येणार आहे.
घोडबंदर मार्गावर सुरू असलेल्या रस्ते विकासाच्या कामामुळे गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. एकीकडे कामांमुळे खोदून ठेवलेले रस्ते तर दुसरीकडे महामार्गावर पडलेले खड्डे आणि कोसळणारा पाऊस. अशा तिहेरी कोंडीत वाहने अडकत आहेत. त्यातच अपघातांची संख्याही वाढली आहे. हे अपघात टाळण्यासाठी सिग्नलपाशी वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहने नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी मंगळवारी (ता. १४) पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडले. या सूचनेचा अवलंब करण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस यांनी संयुक्तपणे पाच ठिकाणांची निवड करावी. तेथे प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था करावी, असे निर्देश राव यांनी दिले. हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीने त्याचा इशारा देणारी पाटी, रिफ्लेक्टर्स आदी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने कराव्यात. इंडियन रोड कॉंग्रेसने निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करावे, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे समन्वय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह एमएमआरडीए, मेट्रो यांचे अधिकारी उपस्थित होते.

५० मीटर आधीच वेग मंदावणार
पालिका आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतर वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिग्नलच्या दिशेन वाहने येताना त्यांचा वेग आधीच कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सिग्नल परिसरात म्हणजे किमान ५० मीटर आधीच वेग नियंत्रण पट्ट्या लावण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि अपघातही कमी होतील, असा विश्वास शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे.

ओवळा, आनंदनगर सिग्नलपासून शुभारंभ
वेग नियंत्रण पट्ट्या लावण्यासाठी सर्वप्रथम ओवळा आणि आनंदनगर येथील सिग्नलची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी हे काम सुमारे १० ते १५ दिवस चालेल. त्यानंतर उर्वरित ठिकाणी पट्ट्या लावण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com