श्रीवर्धनमध्ये दरडीचा धोका

श्रीवर्धनमध्ये दरडीचा धोका

Published on

श्रीवर्धनमध्ये दरडीचा धोका
प्रशासन सज्ज असल्याचा तहसीलदारांचा दावा; नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन
श्रीवर्धन, ता. २५ (बातमीदार) : पावसाळा सुरू होताच श्रीवर्धन तालुक्यात डोंगरउतारावरून दरडी कोसळण्याच्या घटनांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी दिघी मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अशी घटना पावसात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी प्रशासन सज्ज असून उपाययोजनांना सुरुवात केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
समुद्रकिनारा आणि डोंगराळ भूभाग मिळून बनलेल्या श्रीवर्धन तालुक्यात दरवर्षी अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि दरड कोसळण्याच्या घटनांचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरउतारालगत प्रवास करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने अशा ठिकाणी वेळेवर आवश्यक ती संरक्षक उपाययोजना आणि इशारा फलक लावणे गरजेचे असताना, अनेक दरडग्रस्त भाग अजूनही दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे. डोंगरउताराजवळील रस्त्यांवर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने सज्ज असणे आणि नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. श्रीवर्धन हा पर्यटन तालुका असल्याने श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, आदगाव, शेखाडी, वेळास अशा समुद्रकिनारी व धबधब्यावर पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. काही दिवसांपूर्वी दिघी मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्‍यामुळे तालुक्‍यात दरडींची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने दरडीबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.
..................
दरडग्रस्त ठिकाणी फलक नाही
- घाटरस्त्यांवर दरड कोसळण्याचा संभाव्य धोका ओळखून अत्यावश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र प्रशासनाकडून संरक्षक उपाययोजना तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांक असलेले सूचना फलक लावण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
......................
निवारा शेडचे काम सुरू
श्रीवर्धन तालुक्यात मुसळधार पावसाच्या वेळी दरडींचा धोका लक्षात घेऊन आम्ही सर्व संबंधित विभागांशी बैठका घेतल्या आहेत. तालुक्यात श्रीवर्धन व बागमांडला येथे निवारा शेडचे काम सुरू आहे. इतर दहा ठिकाणी शेडसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. गावानुसार पालक अधिकारी नेमले असून, तालुक्यात सुमारे पाच दरडग्रस्त ठिकाणे आहेत. अतिवृष्टीच्या वेळी अशा ठिकाणी नागरिकांना निवारा शेडकडे स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे श्रीवर्धनचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com