पालिका भूखंडांवरून आरोपांची राळ
भाईंदर, ता. २६ (बातमीदार): मिरा-भाईंदर पालिकेच्या नावावर असलेले भूखंड हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे एका महिन्याच्या आत हे भूखंड ताब्यात घेतले नाहीत, तर आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करू, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
काशी मिरा भागातील अपना घर या गृह संकुलात २७५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा सुविधा भूखंड आहे. संकुल विकसित झाल्यानंतर तो भूखंड महापालिकेला हस्तांतर करणे बंधनकारक आहे, मात्र हा भूखंड महापालिकेकडे आजतागायत हस्तांतर झालेला नाही. या भूखंडावर आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराणा प्रताप भवन बांधण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून निधीदेखील मंजूर केला आहे. तसेच निविदा प्रक्रिया पार पडून कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आले आहेत, परंतु भूखंड ताब्यात नसल्याने काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे प्रताप सरनाईक पालिकेविरोधात आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे भाईंदर पूर्व येथील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावरदेखील बाय बॅक या योजनेतून गृहसंकुलाचे काम सुरू आहे. हे दोन्ही भूखंड महापालिकेकडे हस्तांतर झाले नसल्याने एक महिन्याच्या आत दोन्ही भूखंड महापालिकेकडे हस्तांतर करून घेण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
--------------------------------------------------
निवडणुकांपूर्वीच वाद शिगेला
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहता व सरनाईक यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. भाजप व शिवसेना दोन्ही पक्ष निवडणूक स्वतंत्रपणे लढवू इच्छित असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे मेहता यांच्यावर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आरोपांना मेहता यांनी प्रत्युत्तर दिले असून, अपना घर येथील सुविधा भूखंड महापालिकेच्या नावावर करून दिला आहे, तर दुसरीकडे कोर्ट यार्ड येथील उद्यानाचा भूखंड इमारतीचा भोगवटा दाखला घेण्याआधी पालिकेकडे हस्तांतर करण्यात येईल, असे लेखी कळविण्यात आले असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.