रिक्षाचालकांची अघोषित भाडेवाढ
रिक्षाचालकांची अघोषित भाडेवाढ
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : एकीकडे वाहतूक पोलिसांनी नियमबाह्य प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. याच कारवाईचे कारण पुढे करत रिक्षाचालकांनी चार-पाच दिवसांपासून प्रवाशांकडून वाढीव पाच ते दहा रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवलीतील रिक्षाचालक मनमानी पद्धतीने सरसकट भाडेवाढ करत आहेत; मात्र त्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. ज्या प्रवासासाठी यापूर्वी १५ ते २० रुपये आकारले जात होते, तेथे आता २० ते २५ रुपये प्रवाशांकडून मागितले जात आहेत. या अघोषित भाडेवाढीविरोधात प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात बहुतांश चाकरमानीवर्ग असून, ते ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात कामानिमित्त लोकलने प्रवास करतात. स्थानक परिसरापासून लांब राहणाऱ्या प्रवाशांना शहरात सार्वजनिक वाहतुकीचे साधन वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना रिक्षावर अवलंबून राहावे लागते. शेअरिंग रिक्षाने प्रवासाचा मार्ग परवडत असल्याने बहुतांश प्रवासी रिक्षाने प्रवास करणे पसंत करतात, मात्र कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालक हे प्रवाशांच्या या अडचणीचा गैरफायदा घेत मनमानी पद्धतीने भाडेवाढ करत चालले आहेत. २०२२ मध्ये ही रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने शेअर रिक्षाभाडे तीन ते पाच रुपयांनी वाढवले होते. यावर वाहतूक विभागाने रिक्षा भाडेवाढ झाली नसल्याचे सांगत स्थानक परिसरात रिक्षादराचे फलक लावले होते; मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दोन दिवसांत हे फलक गायब झाले.
आता पुन्हा एकदा रिक्षाचालकांनी भाडेवाढ केली आहे. शेअरिंग रिक्षात चौथ्या तसेच पाचव्या प्रवाशाची बेकायदा वाहतूक रिक्षातून होत आहे. वाहतूक पोलिसांनी अशा नियमबाह्य प्रवासी रिक्षात बसविणाऱ्या रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षा संघटनांनी या कारवाईला विरोध करत रिक्षा बंद करत प्रवाशांना वेठीस धरले; मात्र रिक्षा संघटनांच्या या मागणीला न जुमानता वाहतूक पोलिसांनी ही कारवाई सुरूच ठेवली आहे. रिक्षाचालकांना तीन प्रवासी वाहतूक परवडत नाही, त्यांचा तेवढा व्यवसाय होत नाही. तसेच सध्या दंडाच्या रकमेचा भुर्दंड त्यांच्यावर पडल्याने रिक्षाचालकांनी सरसकट तीन, पाच ते १० रुपयांची वाढ केली आहे.
प्रवाशांकडून संताप
ज्या अंतरासाठी पूर्वी १५ रुपये आकारले जात होते, तेथे आता १८ रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे, तर ज्या प्रवासासाठी २२ रुपये आकारले जात होते, तेथे २५ रुपये आकारण्यास रिक्षाचालकांनी सुरुवात केली आहे. शेअरिंग रिक्षाने प्रवास न करता सेपरेट रिक्षा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तर सरसकट १० रुपये अधिकचे घेतले जात आहेत. लांबचा पल्ला गाठण्यासाठी दुपारच्या वेळी किंवा पाऊस असल्यास रिक्षा मिळत नाही. शेअरिंग रिक्षा या इच्छितस्थळी जात नसल्याने अनेकदा प्रवासी सेपरेट रिक्षाचा पर्याय निवडतात. जिथे प्रवासाचे ४० रुपये होत होते, त्या प्रवाशांकडून आता ५० रुपये आकारण्यास रिक्षाचालकांनी सुरुवात केली आहे. या भाडेवाढीमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दंडात्मक कारवाई
रिक्षाचालकांवर ऑनलाइन पद्धतीनेदेखील दंडात्मक कारवाई होत आहे. त्या रकमेचा बोजा आमच्या डोक्यावर आधीच असताना आता या कारवाईत आणखी वाढ झाली आहे. आमची कमाई यातच जात असून, रिक्षाभाडे वाढविण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.