अकरा वर्षांत २९ हजार मृत्‍यू!

अकरा वर्षांत २९ हजार मृत्‍यू!

Published on

११ वर्षांत २९ हजार मृत्‍यू!
रेल्वे की मृत्यूचा मार्ग; आठ हजारांहून अधिक जणांची ओळखही पटली नाही
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबईच्या उपनगरी लोकल रेल्वेसेवेचा प्रवास म्हणजे आता केवळ वेळेची बचत नव्हे, तर तो मृत्यूचा मार्ग बनत चालला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीतील ‘लाइफलाइन’ समजल्या जाणाऱ्या या रेल्वे मार्गावर गेल्या ११ वर्षांत तब्बल २९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी फक्त धक्का देणारी नाही, तर मुंबईच्या वाहतूक यंत्रणेतील गंभीर बिघाड अधोरेखित करणारी आहे. अजूनही आठ हजार ४१६ मृतांच्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही, ही स्थिती भयावहतेच्या सीमा ओलांडणारी आहे.
कामाच्या आणि जगण्याच्या धावपळीत लोकलमध्ये जीव गमावणे मुंबईकरांच्या दैनंदिन वास्तवाचा एक भयानक भाग बनलेय. मुंबईसारख्या शहरात लोकल हा प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. रोज सुमारे ६५ लाख प्रवासी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकलमधून प्रवास करतात. दिवसातून तीन हजारांहून अधिक लोकल फेऱ्यांद्वारे ही सेवा सुरू असते. सध्या एसी लोकलही या सेवेचा भाग बनली असली, तरी प्रवाशांची वाढती संख्या आणि सकाळ-संध्याकाळच्या गर्दीचे प्रमाण पाहता, अनेकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.
पीक अवरच्या काळात एकाच दिशेला लाखो प्रवासी एकत्र होतात. सकाळी उपनगरी भागांतून दक्षिण मुंबईकडे, तर संध्याकाळी मुंबईहून उपनगरांकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना दरवाजावर लटकतच प्रवास करावा लागतो. याच गर्दीच्या झुंबडीतून तोल जाऊन गेल्या ११ वर्षांत सहा हजार ५०० पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. लाखो नागरिक या सेवेवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनासोबतच सर्वसामान्य नागरिकांचीही आहे. प्रत्येकाने नियम पाळल्‍यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. अन्यथा अशा घटनांना कोण रोखणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहील.

वेळ वाचवण्याच्या नादात जीवाशी खेळ
अनेक प्रवासी वेळेची बचत करण्याच्या नादात पुलाऐवजी थेट रुळ ओलांडतात, पण हेच पाऊल त्यांच्यासाठी प्राणघातक ठरते. मेल, एक्स्प्रेस किंवा लोकल गाड्यांचा वेग आणि वेळेचा अंदाज न लागल्याने दरवर्षी शेकडो प्रवासी रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडतात. गेल्या ११ वर्षांत अशा प्रकारे रुळ ओलांडताना १५ हजारांहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ओळख न पटलेले मृतदेह मोठी समस्या
या अपघातांमधील एक मोठी समस्या म्हणजे मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे कठीण काम. आतापर्यंत आठ हजार ४१६ मृत व्यक्तींची ओळख अजूनही पटलेली नाही. अनेकदा मृतदेह इतका विद्रूप अवस्थेत असतो की, नातेवाइकांनाही ओळखणे शक्य होत नाही. अशावेळी रेल्वे पोलिस ओळखपत्र, मोबाइल फोन, अंगावरील दागिने, कपड्यावरील टॅग, टॅटू या माध्यमांतून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात.

कायदेशील पद्धतीने अंत्‍यसंस्‍कार
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले जातात आणि त्यानंतर आठवड्यांपासून ते तीन महिन्यांपर्यंत शवागृहात ठेवले जातात. यादरम्यान, जीआरपी विविध पोलिस ठाण्यांमध्ये मृतांचे फोटो आणि माहिती पाठवते. हरवलेल्यांच्या तक्रारींची उलटतपासणी केली जाते. डीएनए नमुने जतन करून वस्तूंची यादी तयार केली जाते, मात्र नातेवाईक सापडले नाहीत, तर पोलिस रुग्णालयातून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन कायदेशीर पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात.

२०१४ ते २०२४ – अपघाती आकडेवारी (जीआरपी आकडेवारीनुसार)
- २९,००० पेक्षा अधिक मृत्यू रेल्वे अपघातांमध्ये
- १५,००० प्रवासी रुळ ओलांडताना मृत्युमुखी
- ६,५०० पेक्षा अधिक प्रवासी लोकलमधून पडून ठार
- ८,४१६ मृत व्यक्तींची अजूनही ओळख न पटलेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com