राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त चर्चासत्रा
विद्युत सुरक्षेबाबत चर्चासत्र
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : सध्याच्या काळात सर्वच ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्यामार्फत आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या महापालिकांचे कार्यकारी अभियंता, विद्युत कर्मचारी, विद्युत कंत्राटदार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. विद्युत कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनीही अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
आज सुरक्षेची अनेक उपकरणे आणि माध्यमे उपलब्ध आहेत; मात्र तरीही विजेशी संबंधित कोणतेही काम करताना विद्युत कर्मचाऱ्यांनी खबरदारी आणि काळजी घेणे आवश्यकच आहे. कारण लहान लहान गोष्टींतूनच मोठमोठ्या घटना आणि अपघात घडतात, असे चर्चासत्रात सांगण्यात आले. आताच्या काळात घराच्या इंटिरिअरकडे जितके लक्ष दिले जाते, तितकेच घरातील वायरिंगकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा महत्त्वाचा मुद्दा या वेळी अधोरेखित करण्यात आला. तर विद्युत वाहिनीचे काम करताना कितीही जुने आणि जाणते कर्मचारी अधिकारी असलात तरीही धक्का तुम्हाला सांगून लागत नाही. त्यामुळे काम करताना आपण सतत खबरदारी आणि दक्षता बाळगणेही अत्यावश्यक असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचे माजी संचालक टी. शंकर नारायण, महाराष्ट्राचे विद्युत निरीक्षक आर. आर. यादव, सहनिरीक्षक भूषण मानकामे यांच्यासह यशवंत पाटील, कार्यकारी अभियंता राजू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
वीज मीटर फेजिंग आणि मुख्य वायरिंग, घरापासून मीटरपर्यंत येणारी वायर, काम करताना घ्यायची काळजी, पॅनेलवर काम करताना घ्यायची काळजी, कोणती उपकरणे वापरावी, शॉर्टसर्किटमुळे लागणारी आग, इमारतीमधील फायर फायटर यंत्रणेचे पॅनल, त्याची तपासणी, आरसीसीबी उपकरणाची गरज, एफआरएलएसएच केबलचे महत्त्व, अर्थिंग अशा अनेक लहान-मोठ्या मुद्द्यांवर विद्युत निरीक्षक आर. आर. यादव, सहनिरीक्षक भूषण मानकामे, जाधव यांच्यासह इतर तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.