थोडक्यात बातम्या ठाणे
अंडा व्यावसायिकाची दुचाकी चोरीला
ठाणे : शास्त्रीनगर नाक्यावर रात्री पार्क केलेली अंडा व्यावसायिक ऋषीकेश मोहपरेकर यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्या दुचाकीची किंमत २५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मोहपरेकर हे अंड्यांचा टेम्पो घेऊन डिलिव्हरीला गेले होते. तसेच रात्री उशीर झाल्याने दुचाकीऐवजी टेम्पो घेऊन त्यांनी घर गाठले. दरम्यान, त्याच रात्री दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.......
मोबाईल फोन लांबवला
ठाणे : नौपाडा परिसरातील फिजिओथेरपी क्लिनिक येथून कामावरून घरी पायी चालत जात असताना, नौपाड्यातील लोकमान्य सोसायटीसमोरील रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिजिओथेरपिस्ट आयुषी पांचाळ यांचा मोबाईल जबरदस्तीने खेचून पोबारा केला. ही घटना बुधवारी (ता. २५) रात्री घडली असून, याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चोरीला गेलेल्या मोबाइलची किंमत ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
...........
हॉटेल्समध्ये तीन लाखांची चोरी; रोख रकमेसह दारूच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : घोडबंदर रोडच्या कासारवडवली नाक्यावरील संजोग वाइन अँड डाइन नामक हॉटेलचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. यामध्ये दोन लाख ७१ हजारांहून अधिक रोख रकमेसह संगणक आणि दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. रोख रकमेत कामगारांच्या पगारासह व्हॅट, जीएसटी आणि इतर खर्चासाठी ठेवलेली रक्कम असल्याचे तक्रारदार शेखर शेट्टी यांनी नमूद केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
गुरुवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास साफसफाई झाल्यानंतर हॉटेल बंद करण्यात आले. तसेच शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हॉटेल उघडण्यासाठी कर्मचारी आल्यावर शटर उचकटल्याचे निदर्शनास आले. तसेच हॉटेलाच्या कॅश काउंटरसह तीन ड्रॉवरचे लॉक तुटल्याचे समोर आले. त्यातील रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या तसेच काउंटरवरील संगणक असा ऐवज चोरट्यांनी नेल्याचे समोर आले. व्हॅटसाठी ठेवलेले एक लाख २७ हजार १३० रुपयांसह जीएसटीचे ३२ हजार २३०, कामगारांच्या पगाराचे १४ हजार ५००, इतर खर्चाचे आठ हजार रुपये तसेच रोख ८९ हजार ५०० रुपये, शिवाय सहा हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या तसेच १० हजारांचा संगणक असा दोन लाख ८७ हजार ३६० रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कासारवडवली पोलिस करीत आहेत.
...................
नौपाड्यात गाड्यांवर कोसळले झाड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : नौपाडा, विष्णूनगर परिसरात रस्त्यावर पार्क केलेली एक चारचाकी आणि एक दुचाकी अशा दोन गाड्यांवर झाड कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून, गाड्यांचे नुकसान झाले आहे. नौपाडा परिसरात पार्क केलेल्या गाड्यांवर झाड पडल्याची माहिती माजी नगरसेवक सुनेश जोशी यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच पडलेले झाड कापून एका बाजूला करण्यात आले. या घटनेत दीपक शेटे यांच्या मालकीच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात तर रश्मीन गुरव यांच्या मालकीच्या दुचाकीचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.