ठाण्यात डेंगी, मलेरियाचा ताप
ठाण्यात डेंगी, मलेरियाचा ताप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा आणि डासांच्या उपद्रवामुळे साथीचे आजार बळावतात. पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणारे पाणी, कचऱ्याचे ढीग यामुळे साथीचे आजार डोके वर काढण्यास सुरुवात करतात. ऊन-पावसाच्या खेळामुळे साथीच्या आजाराचे रुग्णदेखील वाढत आहेत. सध्या डेंगी, मलेरिया, अतिसार यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. मागील २६ दिवसांत ठाणे पालिका क्षेत्रातील खासगी व पालिका रुग्णालयांत डेंगीचे ६५, तर मलेरियाचे ५५ रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जून महिन्यात ठाण्यातील अनेक सखल भागांत पाणी तुंबण्याच्या घटनादेखील घडल्या होत्या. जागोजागी कचरा साचल्याचे चित्रदेखील काही भागांत दिसून आले होते. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरत आहे. पावसामुळे साथीचे आजारदेखील वाढले आहेत. दरवर्षी साथीच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयात आवश्यक सुविधांची तयारी आधीच केली आहे. पुरेसा औषधसाठाही मागविण्यात आला आहे. थंडी-तापाच्या रुग्णांवर तत्काळ उपचार केले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी याने नागरिक हैराण असून, अशा रुग्णांची खासगी दवाखान्यात गर्दी होत असल्याचे दिसत आहे. साथीच्या आजारांपाठोपाठ गेल्या काही दिवसांपासून डेंगी आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मे महिन्यात डेंगीचे १५ रुग्ण, तर मलेरियाचे १६ रुग्ण आढळून आले होते. जून महिन्यात या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. १ ते २६ जून या कालावधीत महापालिका क्षेत्रात डेंगीचे ६५ तर मलेरियाचे ५५ रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
काय काळजी घ्यावी?
आठवड्यातून एकदा साठवलेले पाणी पूर्णपणे रिकामे करावे. पाणी साठवण टाक्या झाकून ठेवाव्यात. प्लॅस्टिक बाटल्या, टायर यांचा योग्य निपटारा करा. गटार, नाल्यांची नियमित सफाई करा. पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा, विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळेत डास प्रतिबंधक क्रीम, लोशन वापरा. डास जास्त असलेल्या भागांत जाणे टाळा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.