कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

पाच हजार फूट आकाशात फडकवणार झेंडा
कल्याण (वार्ताहर) : नागरी संरक्षण स्थापना दिनानिमित्त गुरुवारी (ता. १० जुलै) पॅराजम्पर अजित कारभारी १३ ते १५ हजार फूट आकाशात झेंडा फडकवणार आहेत. याबाबत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अजित कारभारी यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासन गृह विभाग विशेष, नागरिक संरक्षण दल ठाण्याचे नियंत्रक अशोक शिनगारे आणि उपनियंत्रक विजय जाधव, सहाय्यक उपनियंत्रक अनिल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पॅराजम्पर अजित कारभारी नागरी संरक्षण दलाचा स्थापना दिवसासाठी आकाशात झेंडा फडकवणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी नागरी संरक्षण व आपत्ती व्यवस्थापनासाठी नागरी संरक्षण संघटनेचे स्वयंसेवक बनवून देशसेवा करावी, यासाठी अजित कारभारी प्रयत्नशील आहेत.
...................
माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
कल्याण (वार्ताहर) : शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर एका महिलेने विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे; मात्र ज्या महिलेला मी ओळखत नाही, तिला आजपर्यंत मी कधी पाहिले नाही, त्या महिलेने माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. पंधरा वर्षांपासून मी या प्रभागात नगरसेवक म्हणून काम करीत आहे. सर्व पक्षांतील लोकांना माहीत आहे, की मोहन उगले असेल तर आपण जिंकू शकत नाही. त्यामुळे माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मोहन उगले यांनी दिली.
................
स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने रेशन कार्ड शिबिर
कल्याण (वार्ताहर) : स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पश्चिममधील टावरीपाड्यातील शंकेश्वर प्रेसिडेन्सीमध्ये शुक्रवारी (ता. ४ जुलै) सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत एकदिवसीय रेशन कार्ड शिबिराचे आयोजन केले आहे. रेशन कार्ड ही सर्वांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या अशा कागदपत्रांपैकी एक आहे. या माध्यमातून सरकारी योजनेचा लाभ, विविध शासकीय कार्यालयात रेशन कार्डचे महत्त्व आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कार्डसोबत सफेद रेशन कार्डलाही आता शासकीय आरोग्य सेवेचा फायदा होणार आहे. त्यानुसार सर्वांना या एकदिवसीय शिबिरातून नवीन रेशन कार्ड नोंदणी, नाव वाढवणे कमी करणे, रेशन दुकान व रेशन कार्डवर पत्ता बदल, बायोमेट्रिक अशी विविध सुविधा, स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर, स्फूर्ती फाउंडेशन महिलाप्रमुख शिल्पा तांगडकर व शांताराम तांगडकर यांनी केले आहे.
...................
लव्हाळी येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन
कल्याण (वार्ताहर) : स्वामी गोशाळा परिसर लव्हाळी (अंबरनाथ) येथे नवनिर्मित आरोग्य केंद्राचे उद्घाटन रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन दिनेश मेहता आणि ज्योती मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइडच्या वतीने या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली. या कार्यक्रमाला क्लब अध्यक्ष रोटेरियन योगेश कल्हापुरे, क्लब फर्स्ट लेडी योगिता कल्हापुरे, प्रकल्प प्रमुख डॉ. अवधूत शेटे, महेश टिबे, नीता टिबे, अपूर्वा शेटे, संजय माचवे, सुनील शर्मा, व्हिनस जॉय, सहसचिव मंदार पाठक आदी रोटेरियन सदस्य उपस्थित होते. गोशाळा ट्रस्टचे परागबुवा रामदासी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा दिला. या वेळी नमूद केले, की क्लबने दोन वर्षांपूर्वी दिलेली रुग्णवाहिका आजही परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. आठ किमी परिसरात शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने हे केंद्र सुमारे १० ते १२ हजार नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणार आहे. ‘सेवा परमो धर्मः’ या तत्त्वावर काम करणारे अध्यक्ष योगेश कल्हापुरे यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले. डी. जी. दिनेश मेहता यांनी रोटरीच्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून नियमित सेवा देण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमात ईशा नेत्रालयाच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सत्कर्म बालकाश्रमातील मुलांना छत्र्यांचे वाटप केले. या वेळी प्रमोद राजकारणे उपस्थित होते. डॉ. अनंत इटकर व डॉ. अवधूत शेटे यांनी आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com