जिल्ह्यातील शेतकऱ्याला सुगीचे दिवस
वाणगाव, ता. २९ (बातमीदार) : आधुनिक तंत्राचा वापर करून परिस्थितीनुसार शेती पद्धतीत बदल केल्याने जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा २४ हेक्टरने भातलावणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे आधुनिक शेतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याला सुगीचे दिवस आले आहेत.
जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात यांत्रिकीकरण, भात ट्रे रोपवाटिका, राबविरहित भातलागवड, सगुणा तंत्रज्ञान, चारसूत्री तंत्रज्ञान, टोकन पद्धतीने भातशेती केली जात आहे. या पद्धतींमुळे लागवड क्षेत्र सुमारे ९५ हेक्टर झाले आहे. २०२३-२४ मध्ये सरासरी ७६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्र भातलागवडीखाली होते, परंतु २०२४-२५ मध्ये २४ हेक्टरने वाढ होत ७६ हजार ६६८ वर पोहोचले आहे. २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा हा यांत्रिकीकरणाकडे असून, भातलागवड क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यामध्ये सरासरी १३ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रावर भातलावणी करण्यात येते. तालुक्यात ११२ टक्क्यांवर हे प्रमाण गेले असून, १५ हजार ६३५ हेक्टर परिसरात लावणी करण्यात आली आहे.
---------------------------------------
उत्पन्नात वाढ
जव्हार, मोखाडा आणि डहाणू तालुक्यात भातलावणीचे क्षेत्र १०० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. चारसूत्री लावणीमध्ये युरिया डीएपीचा वापर केल्यामुळे खताची उपलब्धता जास्त कालावधीपर्यंत होते. खताच्या खर्चात बचत होते. भातपिकाच्या फुटव्यात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. चारसूत्री तंत्र आत्मसात करण्यास सोपे, जमिनीचा पोत सुधारणारे, मजुरी व खतांचा खर्च कमी करणारे असल्याने भातशेती फायदेशीर आहे.
-----------------------------------------------
भातशेतीचे सगुणा तंत्रज्ञान
नांगरणी, चिखलणी व लावणी करावी लागत नसल्यामुळे खर्च ५० ते ६० टक्क्यांनी कमी होतो. भातकापणीसाठी आठ ते १० दिवस आधी तयार सगुणा तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जमिनीमध्ये ग्रहण करता येतो. त्यामुळे जमिनीतला कर्ब वाढतो आणि हवेतील कर्ब कमी होतो. म्हणून हवामान बदलावर सगुणा तंत्र उपयुक्त आणि परिणामकारक उपाय ठरत आहे.
----------------------------------------
अल्पभूधारकांसाठी हातचलित यंत्र
सध्या यंत्रांच्या किमतींमुळे सामान्य शेतकऱ्याला भातलागवड करणे खर्चिक झाले आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाने कमी किमतीत शेतकऱ्यांसाठी हाताने चालविण्याचे भातलावणीचे यंत्र विकसित केले आहे. त्यामुळे कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना हातचलित यंत्र फायदेशीर ठरले आहे.
----------------------------------------
शून्य मशागत तंत्रज्ञान यंत्राच्या सहाय्याने भातलागवड, माती परीक्षणनुसार खतांचा वापर, भातकापणीसाठी रिपरचा वापर, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन यामुळे भातशेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करावी.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर
------------------------------------------
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातलावणीच्या वेळी जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आणि पाण्याची जलधारण क्षमता वाढविण्यासाठी चिखलणीच्या वेळेला भात खाचरात गिरीपुष्प, ताग, धैंचा, अशा हिरवळीच्या वनस्पतींच्या पाल्याचा अवलंब करावा. जेणेकरून जमिनीचे आरोग्य टिकून राहील तसेच जमिनीला नत्राचा पुरवठादेखील होऊ शकेल.
- डॉ. अमोल दहिफळे, प्रमुख, कृषी संशोधन केंद्र, पालघर
--------------------------------------------
भातपिकासाठी पेरणी, लावणी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन आणि कापणी योग्यवेळी केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.