सीसीटीव्हीचा डेटा पुण्यात सुरक्षित
सीसीटीव्हीचा डेटा पुण्यात सुरक्षित
‘बॅकअप रिसिव्हर सेंटर’च्या जागेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची मान्यता
ठाणे, ता. २९ : ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बसविण्यात येणाऱ्या सहा हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डाटा हा आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षित राहावा, यासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘बॅकअप रिसिव्हर सेंटर’च्या जागेसाठी ठाणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. महापालिका प्रशासनानेही जागा देण्याबाबत हिरवा कंदील नुकताच दाखवला आहे. यामुळे भविष्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डेटा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात सुरक्षित राहणार आहे.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गुन्हेगारांना जरब आणि आळा बसावा, म्हणून ठाणे शहरापासून भिवंडी, उल्हासनगर, वागळे इस्टेट या चार परिमंडळांतील एक हजार ९९७ ठिकाणी सहा हजार ५९ इतके सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार करून तो राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता देत प्रकल्पासाठी ५७० कोटी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतल्यानंतर एका मागून एक अडचणी पोलिस आयुक्तालयातील स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत निर्माण झाल्या होत्या. त्यातून मार्ग काढत अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याच्या कामांना सुरुवात झाली. आतापर्यंत बसवलेल्या अडीच हजार कॅमेऱ्यांपैकी ३०० कॅमेरे सद्य:स्थितीत कार्यान्वित झाले आहेत. दिवसागणिक ती संख्या वाढत आहे. त्यातच सीसीटीव्हीसाठी लागणारे पोल, मीटर बॉक्स आणि इतर कामेही सुरू आहेत. याशिवाय पोलिस आयुक्तालयातील इंटिग्रेट कमांड अँड कंट्रोल सेंटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एकंदरीत ३० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकर पूर्ण होईल, असा विश्वास वर्तविला गेला. तसेच या कामासाठी मार्च २०२६ही डेडलाईन असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, सहा हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डेटा हा आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहावा, यासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘बॅकअप रिसिव्हर सेंटर’च्या जागेसाठी ठाणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यास महापालिका प्रशासनाने जागा देण्याबाबत नुकतेच हिरवा कंदील दाखवला आहे.
.................
डेटा सुरक्षित राहावा यासाठी पुण्याची निवड
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डेटा सुरक्षित राहावा, म्हणून १०० किमीच्या अंतरावर बॅकअप रिसिव्हर सेंटर असावे, यासाठी या जागेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवड करून पत्रव्यवहार सुरू ठेवला. सेंटरसाठी जागा देण्यास पालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखवत जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. या सेंटरचे येणारे लाईटचे भाडे पोलिस भरणार आहेत. अशाप्रकारे ठाण्याचा आपत्कालीन परिस्थितीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डेटा पुण्यात सुरक्षित राहणार आहे.
...................
सेंटरसाठी २० जणांची फौज
ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बसविण्यात येणारे सहा हजार ०५९ सीसीटीव्ही कॅमेरे एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. त्यासाठी पोलिस मुख्यालयाच्या इमारतीत इंटिग्रेट कमांड अँड कंट्रोल सेंटर तयार करण्यात आले आहे. तेथे २० जणांची फौज तैनात असणार असून, यामध्ये एक अधिकारी आणि १९ अंमलदार कार्यरत असणार आहेत.
..................
पोलिस आयुक्तालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामधील सद्य:स्थितीत ३००हून अधिक कॅमेरे लाइव्ह आहेत. आपत्ती परिस्थितीत हा डेटा सुरक्षित राहण्यासाठी पुण्याच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत बीआरएस (बॅकअप रिसीव्हर सेंटर) स्टेशन उभारले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने नुकतीच परवानगी दिली आहे. तसेच या कामाची डेडलाईन मार्च २०२६ असून, त्यानंतर शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्र हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येईल.
- प्रदीप कन्नलू, सहाय्यक पोलिस आयुक्त, ठाणे शहर पोलिस
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.