शहरात कचऱ्यामुळे दुर्गंधी
शहरात कचऱ्यामुळे दुर्गंधी
चेन्नई पॅटर्नवर नागरिकांचा सवाल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : कल्याण-डोंबिवली शहरे स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी चेन्नई पॅटर्न राबविला जात आहे. दुसरीकडे पावसातच गटारांची सफाई करून त्यातील गाळ रस्त्यावर उघडा टाकला जात आहे. गटारांची झाकणे तुटलेली आहेत, रस्त्याच्या कडेला गाळ साचला आहे, असे गलिच्छ दृश्य शहरात दिसून येत आहे. काही ठिकाणी तर चक्क हॉटेलचालकांसाठी कचऱ्याच्या गाड्या दिवसरात्र सोसायटीच्या खाली उभ्या करून ठेवल्या जात आहेत. यामुळे शहरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. विशेष बाब म्हणजे आमदार राजेश मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयायाच्या बाजूलाच हे चित्र असून हाच का चेन्नई पॅटर्न, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
कल्याण-डोंबिवली शहरे कचरामुक्त, स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्चून चेन्नई पॅटर्न प्रकल्प राबविला जात आहे. खासगी कंपनीला ते कंत्राट देण्यात आले आहे; मात्र डोंबिवली शहरात सर्वत्र गलिच्छ दृश्य आहे. पावसाळा सुरू असतानादेखील शहरातील गटारांतील गाळ, कचरा काढण्याची कामे अद्याप सुरू आहेत. हा कचरा काढून गटाराच्या बाजूलाच टाकला जात आहे. पावसाच्या पाण्यात ती घाण मिसळून नागरिकांना त्यातून वाटचाल करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना साथीचे आजार जडत आहेत.
पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याकडेला गाळ, घाण वाहून साचत आहे. त्याची स्वच्छतादेखील पालिका प्रशासनाकडून केली जात नाही. दिवसेंदिवस हा गाळ साचल्याने पदपथांच्या बाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पदपथावरील गटारांची झाकणे तुटलेली आहेत. फुटपाथच्या लाद्या उखडल्या आहेत.
नागरिक हतबल
डोंबिवलीतील टंडन रोडवर हॉटेल व्यावसायिकांसाठी हॉटेल सोसायटीच्या बाजूला दिवसरात्र घंटागाडी उभी करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना दिवसरात्र या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे हा कचरा कुजल्याने नागरिकांना घराच्या खिडक्या बंद करून बसावे लागत आहे. नागरिकांनी याविषयी वारंवार तक्रारी केल्या आहेत; मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने ते हतबल झाले आहेत.
वाहतूक कोंडीची समस्या
डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर रोडचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे टंडन रोडवरून सर्व वाहने वाहतूक करीत आहेत. पूर्व-पश्चिमेला प्रवास करणारी वाहनेदेखील टंडन रोडचाच वापर करीत आहेत. येथील एका हॉटेलच्या बाजूलाच मोठी आरसीसी घंटागाडी रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे येथील बाजूच्या गल्लीत छोटी घंटागाडी दिवसरात्र उभी केली जाते. टंडन रोडवर मच्छी मार्केट आहे. चिकन, मटण विक्रेत्यांची दुकाने आहेत. यामुळे मांस, मच्छीच्या कचऱ्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते. सकाळ-संध्याकाळ घंटागाडीत हा कचरा राहत असल्याने नागरिकांना नकोसे झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.