तुर्भे नाका पादचारी पुलावर फेरीवाल्यांचे बस्तान

तुर्भे नाका पादचारी पुलावर फेरीवाल्यांचे बस्तान

Published on

तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : तुर्भे नाका पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे पादचारी पुलावरून जाताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळेच फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अतिक्रमण विभागाकडून दैनंदिन कारवाई केली जाते. पादचारी पुलावर फेरीवाले असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे तुर्भे विभागाचे सहाय्यक उपायुक्त सागर मोरे यांनी सांगितले.
तुर्भे एमआयडीसी आणि तुर्भे नागरी वस्ती यांना जोडण्यासाठी अनेक दशकांपासून तुर्भे नाका येथे पादचारी पूल उभारण्यात आला आहे. या पुलाची उभारणी झाल्यानंतर काही दिवसांतच येथे फेरीवाल्यांनी त्याचा ताबा घेतला. पालिका कर्मचाऱ्यांना हाताशी धरून फेरीवाल्यांनी या ठिकाणी अनधिकृत व्यवसाय चालू केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तुर्भे एमआयडीसी झोपडपट्टी परिसरातील शाळकरी मुले आणि रोजगाराकरिता ये-जा करणारे रहिवासी यांना या फेरीवाल्यांच्या अडथळ्याची शर्यत पार करत मार्ग काढावा लागत आहे. या पादचारी पुलावर ५०हून अधिक फेरीवाले बसलेले असतात. यांच्याकडून तुर्भे विभाग कार्यालयातील एक नोटीस बजावणारा हप्ता घेऊन जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याचे समजते.
-----------------
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न
तुर्भे झोपडपट्टीतील रहिवाशांना तुर्भे गावामध्ये माता-बाल रुग्णालयात उपचारासाठी यावे लागते. त्यामुळे या पुलावरून नेहमी महिलांची ये-जा असते. या गर्दीचा गैरफायदा घेत या ठिकाणी भुरट्या चोरांचे प्रमाणही वाढले आहे. फेरीवाल्यांच्या आडून काही गर्दुल्लेदेखील या पुलावर बसलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.
-------------------
पायऱ्यांवर मातीचे ढीग, कचरा
सध्या पादचारी पुलाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने पायऱ्या तुटल्या आहेत. जिने मातीने भरले असून, गुटखा, काडीपेटीसह इतर कचरा पायऱ्यांवर जमा असतो. त्यात फेरीवाल्यांनी बस्तानच मांडले आहे. रविवारी या पुलावरून चालनेदेखील मुश्कील होऊन जाते. नागरिकांना वाट काढत चालावे लागते. फेरीवाले कपडे, भाजी, फळे आदी विविध वस्तू विक्रीसाठी घेऊन स्कायवॉकची जागा अडवून बसतात. त्यात गर्दुल्ले, भिकारीही बसलेले असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com