अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेने पुन्हा एकदा बेकायदा बांधकामांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. शांतीनगर परिसरातील स्काय डोम हॉलच्या टेरेसवरील तब्बल तीन हजार चौरस मीटर वाढीव अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे हे बांधकाम नोटीस, न्यायालयीन प्रक्रिया आणि संधी देऊनही नियमित न झाल्याने महापालिकेला धडक कारवाईचा निर्णय घ्यावा लागला.
उल्हासनगर कॅम्प ३मधील शांतीनगर परिसरात स्थित रिजेन्सी वाणिज्य संकुलातील स्काय डोम नावाच्या हॉलच्या टेरेसवर मोठ्या प्रमाणात म्हणजेच तब्बल तीन हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर अनधिकृत वाढीव बांधकाम करण्यात आले होते. या हॉलच्या माध्यमातून भाडे वसूल करून व्यवसाय सुरू होता; मात्र हे बांधकाम नियमबाह्य असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी महापालिकेला दिल्यानंतर याप्रकरणी हालचाल सुरू झाली.
उल्हासनगर महापालिकेच्या नगररचनाकार विभागाने या ठिकाणी पाहणी केली. बांधकाम बेकायदा असल्याचे निष्पन्न केल्यानंतर हॉलच्या मालकाला नोटीस बजावली होती. त्यानंतरही बांधकाम नियमित करण्यासाठी दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाही. अखेर आयुक्त मनीषा आव्हाळे आणि अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तात हे बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईसाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
स्काय डोम हॉलवरील तब्बल तीन हजार चौरस मीटरच्या अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेने वारंवार नोटिसा पाठवल्या होत्या. पण त्या नोटिसा दुर्लक्षित करण्यात आल्या. त्यामुळे आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात कडक कारवाई केली. ही कारवाई इतर अनधिकृत बांधकामधारकांसाठी इशारा आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. कायदेशीर मार्गानेच विकास करावा.
- गणेश शिंपी, सहाय्यक आयुक्त, उल्हासनगर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.