खारघरवासी मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली

खारघरवासी मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली

Published on

खारघर, ता. ३ (बातमीदार) : खारघर शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांत ४२६ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. खारघरमध्ये दिवसाला दोन ते तीन व्यक्तींचा मोकाट कुत्रे चावा घेत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०२३ या पाच वर्षांत खारघर परिसरात चार हजार २८७ श्वानदंशाच्या घटना घडल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
खारघर शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली असून, रस्त्यांवर कुत्रे टोळीने फिरत असतात. भटक्या कुत्र्यांचा कळप रस्त्याने जाणाऱ्या वाहनांच्या मागे धावल्यामुळे त्यातून अनेक वेळा किरकोळ अपघाताचे प्रकार घडले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडून निर्बिजीकरणची मोहीम राबविली जात आहे; मात्र मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढ होताना दिसत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०२४ या एका वर्षात खारघरमध्ये ८८६ जणांना; तर जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ४२६ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार खारघरमध्ये दिवसाला दोन ते तीन जणांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याचे दिसून येते. खारघर सेक्टर ३६ मधील स्वप्नपूर्ती सोसायटीत मोकाट कुत्र्यांनी महिनाभरात महिला आणि मुलांना लक्ष्य केले आहे. १ जूनला स्पॅगेटी सोसायटीत मोकाट कुत्र्याने सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून जखमी केले होते. मोकाट कुत्र्यांचा विषय महापालिकेने गांभीर्याने घ्यावा व त्यांच्या बंदोबस्तासाठी पावले उचलावीत, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे.
---------------------
लहान मुलावर पनवेलमध्ये उपचार सुरू
मंगळवारी (ता. १) स्वप्नपूर्ती सोसायटीतील आयुष गुप्ता या सातवर्षीय बालकाच्या पायाला मोकाट कुत्र्याने चावा घेतला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर पनवेल येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे शाळेतदेखील जाने बंद झाले असल्याचे आयुष गुप्ताचे आजोबा घनश्याम गुप्ता यांनी सांगितले. त्याच दिवशी सोसायटीमधील रहिवासी अनिता सुरेश खरात ह्या सायंकाळी भाजी आणण्यासाठी जात असताना मागून आलेल्या मोकाट कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. पुढील चार वेळा लसीकरण करावे लागणार आहे. उपचारासाठी जवळपास चार हजारांहून अधिक रुपये खर्च येणार असल्याचे सुरेश खरात यांनी सांगितले.
---------------------
स्वप्नपूर्ती सोसायटी परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असूनस लहान मुले, महिलांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
- दीपक पाटील, रहिवासी, स्वप्नपूर्ती सोसायटी
------------------
खारघर परिसरात पूर्वी मोकाट कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. पालिकेकडून निर्बिजीकरण केले जात असल्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होत असून, नियमितपणे निर्बिजीकरण आणि लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
- डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
----------------
श्वानप्रेमीही जबाबदार?
खारघर, तसेच बाहेरील श्वानप्रेमी खारघर परिसरात मोकाट कुत्र्यांना बिस्कीट, तसेच बिर्याणी खाऊ घालत असल्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पालिकेने श्वानप्रेमींची बैठक घेऊन कुत्र्यांच्या संख्येत वाढ होऊ नये, तसेच निर्बिजीकरण, लसीकरणाविषयी माहिती द्यावी, असे येथील नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com