सायबर चोरांनी लुटले सव्वा कोटी
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : शेअर्स गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून सायबर टोळीने सीवूड्समध्ये राहणाऱ्या ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे एक कोटी ३६ लाख रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी या सायबर टोळी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरिक सीवूड्समध्ये राहण्यास असून फेब्रुवारीत त्यांच्या फेसबुकवर शेअर्स गुंतवणुकीबाबत जाहिरात निदर्शनास आली होती. जाहिरातीतील लिंकवर या ज्येष्ठ नागरिकाने क्लिक करून त्यात आपली वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सायबर टोळीकडून त्यांना एक लिंक पाठवून त्यात वैयक्तिक माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर सायबर टोळीतील प्रिया शर्मा व रिया रावत यांनी व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे माहिती देण्यास सुरुवात केली. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकाने शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असता, त्यांना नफा होत असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे त्यांनी १७ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत तब्बल एक कोटी ३६ लाखांची रक्कम पाठवली. त्यानंतर त्यांना तब्बल सहा कोटी आठ लाख रुपये फायदा झाल्याचे दाखवण्यात आले.
---------------
४८ तासांत नफा देण्याचे आश्वासन
ज्येष्ठ नागरिकाने त्यांची गुंतवणूक रक्कम व त्यावर झालेल्या नफ्याची रक्कम काढण्यासाठी सायबर टोळीकडे व्हॉट्सॲपद्वारे विचारणा केली असता, त्यांची नफ्यासह एकूण रक्कम ४८ तासांत त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने आपली रक्कम काढण्याची विनंती केली असता, सायबर टोळीतील रिया रावत हिने त्यांना राहिलेला कर पूर्ण भरल्यानंतरच त्यांना रक्कम काढता येईल असे सांगितले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.