तरुणींवरील अत्याचारप्रकरणी तीन गुन्हे
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) ः अलिबाग पर्यटनस्थळी महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. दोन दिवसांत शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांची फसवणूक व अत्याचाराचे प्रकार घडले आहेत.
पहिल्या घटनेत मुंबईतील एका तरुणीशी मैत्री करून तिला लग्नाच्या भूलथापा देण्यात आल्या. त्याच कालावधीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ती गर्भवती राहिल्यावर टाळाटाळ सुरू केल्यानंतर तरुणीने तक्रार केली. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात नंदूरबार येथील अजय पवारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही मुंबई येथील रहिवासी असून, आरोपी अजय पवार हा नंदूरबार येथील रहिवासी आहे. या दोघांची मैत्री हॅलो ॲपद्वारे झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्यास सुरुवात केली. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे दोघे जण एकमेकांना भेटायचे. त्यानंतर अजयने तिला लग्नाच्या भूलथापा देऊन शारीरिक संबंध ठेवले, मात्र ती गर्भवती राहिल्यावर जबाबदारी घेण्यास नकार दिला. दरम्यान, वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून सुमारे २५ लाख रुपये घेऊन ते देण्यासही त्याने टाळाटाळ केली. अखेर तरुणीने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सत्यभामा खरात करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, विरार येथील महिला आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांसह चोंढी येथील व्हिलामध्ये कंपनीच्या पार्टीसाठी आली होती. पार्टीनंतर महिलेच्या सहकारी अभिषेक सावडेकर (रा. नवी मुंबई) याने दारूच्या नशेत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक सरिता मुसळे तपास करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन एका तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. मुलगी चार महिन्यांची गर्भवती आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील अल्पवयीन मुलगी अलिबाग तालुक्यातील माची सागरगड आदिवासीवाडीतील असून, आरोपी गोरखनाथ गणेश पवार हा खालापूर तालुक्यातील वावोशी दांडवाडी येथील रहिवासी आहे. सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी व पवारची ओळख फेसबुकवरून झाली होती. त्यानंतर लग्नाच्या भूलथापा देऊन आरोपी पवारने मुलीला अलिबागमध्ये बोलावून शारीरिक संबंध ठेवले. मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गोरखनाथ पवारविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सरिता मुसळे या करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.