अखंड हरीनाम सप्ताहातून साधली एकता
अखंड हरिनाम सप्ताहातून साधली एकता
गोठिवली ग्रामस्थांचे यंदाचे ८९ वर्ष
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरात आषाढी एकादशीनिमित्त वारीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच ठाणे-बेलापूर पट्ट्याला अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा देणारे पहिले गाव म्हणजे गोठिवली होय. १९३५ रोजी गावातील काही मोजक्याच वारकरी संप्रदायातील विठ्ठलभक्तांनी गावात हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली. मंदिर नसल्याने गावातील काही मंडळींनी त्या वेळी गावातील माडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेत बेलाच्या झाडाखाली कागदी ज्ञानेश्वर माउलींची प्रतिमा ठेवून पहिला हरिनाम सप्ताह सुरू केला. त्यानुसार १९४६ रोजी एका गृहस्थाने पंढरपूर येथून विठ्ठल- रखुमाईची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्या वेळी आयोजित करण्यात आलेला सोहळादेखील डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखा झाल्याचे सांगण्यात येते.
जवळपास ७० टक्के ग्रामस्थ हे वारकरी संप्रदाय पंथाचे आहेत. मंदिरात दैनंदिन हरिपाठ, काकड आरतीसह आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते. आषाढी एकादशीनिमित्ताने गावातील विठ्ठल- रखुमाई मंदिरात गेली ८९ वर्षे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. पूर्वी या सात दिवसांत गावात मांसाहार होत नव्हता. पूर्वीप्रमाणेच आजही गावात सात दिवस मांसाहार वर्ज्य केला जातो. तसेच सात दिवस गावात मांसाहार विकण्यास बंदी आहे. ठाणे-बेलापूर पट्ट्यातील गोठिवली गावात हरिनाम सप्ताह आणि हनुमान जयंती हेच खरे जत्रेचे स्वरूप आणणारे उत्सव मानले गेले आहेत. प्रत्येक घरातून दोन-तीन शेर तांदूळ, डाळ, मीठ, मसाला जमा करून हा सप्ताह सुरू करण्यात आला आहे. त्या वेळी या सणाला अख्खे गाव नटूनथटून एकत्र येते. आजही हीच परंपरा गावकीने जपून ठेवली आहे. तर वीणा घेण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांवर जबाबदारी सोपविली जाते. तसेच, सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी अर्थात काळ्याच्या महाप्रसादासाठी सहाशे किलो तांदूळ व इतर साहित्य वापरले जाते. २०२३ रोजी विठ्ठल- रखुमाई मंदिराचा तिसऱ्यांदा जीर्णोद्धार करण्यात आला. विशेष म्हणजे, विठ्ठल- रखुमाई मंदिराचे बांधकाम हे पूर्णतः दगडी असून मंदिराचा कळस हा आळंदी येथील मंदिराच्या कलशासारखे हुबेहूब बसविण्यात आले आहे. तसेच मंदिराचा गाभारा हा पंढरपूर येथील विठ्ठल- रखुमाई मंदिरासारखा पूर्णतः चांदीचा मुलामा देऊन साकारण्यात आला आहे. यासाठी ४० लाखांच्या किमतीची चांदी वापरण्यात आलेली आहे. तसेच संपूर्ण दगडी बांधकाम असणारे मंदिर पाहताक्षणी पंढरपूरच्या विठ्ठल- रखुमाई मंदिराची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. मंदिर उभारणीसाठी तब्बल दीड कोटी खर्च करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.