मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
कासा, ता. ७ (बातमीदार): डहाणू तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. प्रचंड पावसामुळे धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने पाच दरवाजे उघडले आहेत. यामुळे सूर्या नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे अनेक लहान नाले आणि ओढे ओसंडून वाहत असून, परिसरातील शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नदी व नाल्यांच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकिनाऱ्याजवळ कोणताही नागरिक, विशेषतः शेतकरी व शेतमजूर, कामासाठी किंवा मासे पकडण्यासाठी जाऊ नये, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे, मात्र अनेक ठिकाणी नागरिक पुराच्या पाण्यात मासे पकडण्याचा मोह टाळू न शकल्याचे दृश्य दिसत आहे, ज्यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.
कासा येथील सूर्या नदीला मोठा पूर आल्याने चारोटी परिसरातील गुलजारी नदीदेखील ओसंडून वाहत आहे. तसेच घोळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळील नदीपात्रात पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत आजूबाजूच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अजूनही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मॉन्सून पर्यटनाला वेग
मुसळधार पावसातदेखील पर्यटकांनी डोंगर-गडांवर जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. सायवन येथील गंभीर गड, तसेच खडकोना गडावर काही पर्यटक रविवारी (ता. ६) पर्यटनासाठी गेले होते. आसवा गडावर झालेल्या बुधवारी (ता. २) दुर्घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता.