वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Published on

वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग
पश्चिम उपनगरांतील नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कोस्टल रोड (उत्तर) वेसावे ते भाईंदर प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. त्‍यामुळे या प्रकल्पाला वेग द्यावा. कामात येणारे संभाव्‍य अडथळे दूर करण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा. प्रकल्‍प पूर्ततेसाठी विविध शासकीय प्राधिकरण, मंडळे यांच्‍याकडे पाठपुरावा करावा. महापालिकेच्‍या विविध विभागांतर्गत समन्‍वय साधावा, असे निर्देश अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजित बांगर यांनी दिले. पॅकेज बी अंतर्गत गोरेगाव येथे १.२ किलोमीटर लांबीचे फाउंडेशनचे काम सुरू असून, या सर्व कामांची पाहणी बांगर यांनी बुधवारी (ता. ९) केली.
सागरीकिनारपट्टी नियमन क्षेत्रात परवानगीशिवाय कामकाज करता येणार नाही, असे त्यांनी स्‍पष्‍ट केले आहे. या प्रकल्पांतर्गत कांदळवन वळतीकरण प्रस्तावास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्याकडून नुकतीच तत्त्वत: मान्‍यता मिळाली आहे. रस्‍ता संरेखनाच्‍या दृष्‍टीने कळीच्‍या मुद्द्यांवर बांगर यांनी चर्चा केली. पूल विभागाचे अधिकारी व प्रकल्‍प सल्‍लागार या वेळी उपस्थित होते.
महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळ यांच्‍यामार्फत वेसावे-वांद्रे सागरी सेतूचे कामकाज सुरू आहे. याअंतर्गत डबल डेकर पूल उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. बांगर यांनी वेसावे परिसरातील या प्रकल्‍पस्‍थळास भेट दिली. अंधेरी पश्‍चिमेतील आरामनगर, म्हाडा यांचे रेखांकन, केंद्रीय मत्स्य विज्ञान शिक्षण संस्‍था येथील रस्‍त्‍याची पाहणी केली. तेथून पुढे अमरनाथ, बद्रीनाथ गृहनिर्माण संस्‍थामार्गे यारी रस्‍ता येथे सुरू असलेल्‍या पूल कामास भेट दिली. या पुलाचे कार्यारंभ आदेश जारी करण्‍यात आले आहेत. हा पूल किनारी रस्‍ता प्रकल्‍पास जोडला जाणार आहे.
उड्डाणपुलाचा उपमार्ग ज्‍या चौकात उतरतो त्‍या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्‍याची शक्‍यता आहे. ती लक्षात घेता उड्डाणपुलास अतिरिक्‍त उपमार्ग बांधल्‍यास जुहू-विलेपार्ले विकास येथील वाहतूक कोंडी समस्‍येपासून सुटका होऊ शकेल, याचा विचार करावा. उड्डाणपुलाचा उपमार्ग जेथे सुरू होतो, तिथे सुनियोजितपणे रस्‍ता रुंदीकरण करावे, अशा अधिकाऱ्यांना सूचना केल्‍या.

तीन स्तरांमध्ये पूल
लोखंडवाला आंतरमार्गिका येथे भेट दिली. या ठिकाणची आराखडा (डिझाईन) गुंतागुंतीचा आहे. एका बाजूला विधी विद्यापीठाची जागा आहे. भगतसिंग उड्डाणपूल या ठिकाणी उतरतो. पूर्वीच्‍या आराखड्यानुसार रोटरी पद्धतीचा पूल जमीन पातळीवर होता. त्‍यामुळे वाहनांची गती कमी होऊ शकते, याचा विचार करता नवीन आराखड्यात तीन स्‍तरांमध्‍ये पुलाचे काम नियोजित आहे. त्‍यातील पहिला स्‍तर जमिनीवर असेल. त्‍यावर दोन स्‍तरांवर इतर भाग असतील, जेणेकरून विनासिग्‍नल, कोणताही अवरोध न होता वाहतूक सुरळीत होईल.

फाउंडेशनसाठी नाॅन सीआरझेडची जागा
मालाड माइंडस्‍पेस येथील ६०० मीटर अंतरात प्रत्‍यक्षात कामकाज सुरू आहे, त्‍याची पाहणी बांगर यांनी केली. गोरेगाव येथे १.२ किलोमीटर लांबीची ‘नॉन सीआरझेड’ जागा उपलब्‍ध असून, त्‍या ठिकाणी प्रत्‍यक्षात फाउंडेशनची कामे सुरू करण्‍यात आली आहेत. या सर्व कामांचीदेखील बांगर यांनी पाहणी केली.

बोगद्याच्या कामासाठी शासकीय जमीन
प्रकल्पाच्या पॅकेज सी अंतर्गत बोगद्याचे खाचकाम ही महत्त्वाची बाब आहे. त्‍यासाठी शासकीय जमीन उपलब्‍ध आहे. या ठिकाणी एका खासगी विकसकाचा भूखंड आहे. खासगी विकसकाचा भूखंड उपलब्‍ध करून घेण्‍याचे निर्देश बांगर यांनी या वेळी दिले. केंद्र शासनाच्या वन मंत्रालयाची टप्पा - १ अंतर्गत परवानगी मिळाल्याने कोस्टल रोडच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती मिळाली आहे. उच्च न्यायालयाची काम सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होऊ शकणार असल्‍याचे बांगर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com