नागझरी-किराट रस्ता खड्डेमय
तारापूर (बातमीदार) : नागझरी-किराट आणि किराट-चिंचारे या दोन रस्त्यांचे नुकतेच पूर्ण झालेले डांबरीकरण अवघ्या १५ दिवसांत निकृष्ट ठरले आहे. हा संपूर्ण रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. लाखोंचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या रस्त्यांची अवस्था पावसातच उघड झाली असून, कामाचा दर्जा अत्यंत हलाखीचा असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
मेमध्ये या रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत आणि राज्य सरकारच्या विकास निधीमधून मिळून सहा ते सात कोटींचा निधी या दोन्ही कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता; मात्र काम पूर्ण झाल्यानंतर केवळ दोन आठवडे उलटत नाही तोच संपूर्ण रस्ता खचल्यासारखा दिसत आहे. डांबर उखडलेले, खड्डे पडलेले आणि रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक एकत्र येत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.