कोपरी सॅटीससाठी १४ तास महत्वाचे
सॅटीससाठी हवा १४ तासांचा ब्लॉक
ठाणे पालिकेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी; ८० टक्के काम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे स्थानकाचा पूर्वभाग कोंडीमुक्त करण्यासाठी स्मार्ट सीटीअंतर्गत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोपरी सॅटीस दोनचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत ठाणेकर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा मानस आहे; मात्र अंतिम टप्प्यात आलेल्या या प्रकल्पाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेकडून किमान १४ तासांचा मेगाब्लॉक हवा आहे. तशी मागणीही ठाणे महापालिकेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. सलग मेगाब्लॉक देणे शक्य नसल्याने किमान सात दिवस दोन तासांचा ब्लॉक मिळाला तरीही काम पूर्णत्वास नेण्यास मदत होईल, असा दावा ठाणे महापालिकेने केला आहे.
ठाणे स्थानकातून दररोज सुमारे साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकाच्या पश्चिम भागात सॅटीसची उभारणी केली आहे. या सॅटीसमुळे स्थानक परिसरातील वाहतुकीला शिस्त लागली नसली तरी कोंडीतून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच धर्तीवर ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्मार्ट सीटीअंतर्गत कोपरी येथे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा म्हणजेच सॅटीस दोन प्रकल्पाचे काम सुरू केले आहे.
सुमारे २६५ कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला कार्यादेश २०१९ मध्ये देण्यात आले. नियोजनानुसार हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; पण रेल्वेच्या जागेत हा प्रकल्प होणार असल्याने विविध कामांसाठी शासकीय परवानग्या मिळवण्यात बराच कालावधी वाया गेला. त्यात परिसरातील अतिक्रमणे, शौचालये हटवण्यात वेळ खर्ची पडला आणि प्रकल्प आणखी तीन वर्षे लांबला; मात्र आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या कोपरी पुलाच्या येथे पाच गर्डर टाकण्याचे काम बाकी आहे. या कामासाठी साधारण आठवड्याभराचा कालावधी लागू शकतो. त्या कामासाठी ठाणे महापालिकेने येत्या ५ जुलैपासून रेल्वे विभागाकडे रात्रीचा ब्लॉक मागितला होता; मात्र अद्याप मध्य रेल्वेने ब्लॉक दिला नसल्याने काम रखडले आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
सॅटीस दोन प्रकल्पामध्ये १४ बसथांब्यांसह सहा मीटर उंच डेक असेल. तसेच बससाठी सात हजार चौरस मीटरचे टर्मिनल बांधले जाणार आहे. स्थानकाच्या पूर्वेला ११ हजार १०० चौरस मीटर जागा असून त्यापैकी दहा हजार चौरस मीटर जागा रेल्वेची आहे. तर अकराशे चौरस मीटर क्षेत्रफळावर रस्ता आहे. सॅटिस दोनअंतर्गत हा उड्डाणपूल बांधला जात आहे. यासाठी २६५ कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास महापालिकेकडून व्यक्त केला जात आहे.
काम लांबल्यामुळे मनस्ताप
सॅटिस दोनच्या कामाला सुरुवात झाल्यापासूनच कोपरीकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यात या कामाला तब्बल दोन वर्षे विलंब झाल्याने अधिकची भर पडली. यात वाहतूक कोंडी ही समस्या मोठी असून सकाळी आणि रात्री नागरिकांना याला तोंड देत मार्गक्रमण करावे लागते. अनेक वेळा रिक्षा या रस्त्यातच उभ्या करण्यात येत असल्याने दोन्ही बाजूच्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. या सॅटिस पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी रेल्वेस्थानकालगतच बस आगार होते. तेथून टीएमटी, बेस्ट, एनएमटी, मिरा-भाईंदर परिवहन सेवेच्या बस सुटत होत्या; पण या पुलाचे काम सुरू झाल्यावर आता या सर्व बस गावदेवी मंदिर येथून सुटतात. परिणामी, अनेक प्रवाशांना यासाठी गर्दी आणि कोंडीतून वाट काढत तिथे पोहोचावे लागते. तसेच रिक्षाचालकांची मनमानीही सहन करावी लागते. सॅटीस दोनचे काम पूर्ण झाल्यानंतरच हा जाच संपणार असल्याची भावना प्रवाशांची आहे.
सॅटीस दोन प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. स्मार्ट सिटीअंतर्गतचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे ठाणे पूर्ण परिसरातील कोंडी दूर होणार आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. आता ४७ मीटरचे पाच गर्डर टाकल्यानंतर उर्वरित कामालाही गती मिळेल. त्यासाठी मध्ये रेल्वेकडे सात दिवसांचा ब्लॉक मागितला होता. रोज रात्री किमान दोन तासांचा ब्लॉक मिळाल्यास काम फत्ते होईल. या आठवड्याच्या शनिवार- रविवारपासून परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती; पण लवकरच ती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, स्मार्ट सिटी सीईओ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.