दामिनी पथक २४ तास आॅनलाईन

दामिनी पथक २४ तास आॅनलाईन

Published on

दामिनी पथक २४ तास ऑनलाइन
जिल्ह्यात ५६ दामिनी कार्यरत; सहा महिन्यांत ३६ जणांना मदत
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः समाजातील सर्व नागरिकांची सुरक्षितता ज्यांच्या हाती असते, असे पोलिस दलातील एक विशेष पथक म्हणजे दामिनी पथक. समाजातील महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक सुरक्षित राहावे यासाठी २०१६ मध्ये दामिनी पथकाची निर्मिती केली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दामिनी पथक कार्यान्वित आहे. त्यासाठी त्यांना खास प्रक्षिक्षण देण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात ५६ दामिनी कार्यरत आहेत. गेल्या वर्षी १२६० शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या असून, यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंत ९५१ शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पोलिसांची ड्युटी ही २४ तास असते. दामिनी पथकही २४ तास ड्युटीवर असते. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने दामिनी पथकही पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. शाळेच्या बाहेर दामिनी पथक विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत आहेत. त्यामुळे विशेषतः मुली आवर्जून आपली समस्या मांडताना दिसतात. या वेळी दामिनी पथकाने आपल्या नंबरचे कार्ड वाटप केले आहे, जेणेकरून त्यावरील हेल्पलाइनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधता येईल. दामिनी पथकाने यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंत ३६ जणांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे.
शाळा, महाविद्यालयांसोबतच कंपन्यांमध्येही कार्डवाटप करण्यात आले आहे. काही वेळा कामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण होत असते. त्या आपली तक्रार करण्यास घाबरतात. कंपन्यांमध्ये पाॅश कमिटी असली तरी नोकरी जाण्याच्या भीतीने त्या तक्रार करत नाहीत. अशा वेळी त्यांना दिलासा मिळावा, त्यांची समस्या दूर व्हावी, यासाठी हेल्पलाइन नंबर दिले आहेत. या नंबरवर संपर्क साधल्यास तत्काळ मदत मिळणार आहे.
महिलावर्गासोबत ज्येष्ठ व्यक्तींनाही कार्डवाटप केले आहे. अनेक ज्येष्ठ व्यक्ती घरात एकट्याच राहतात. त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करणे, त्यांना कसली मदत हवी असेल, तर तीसुद्धा आम्ही करतो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देतो, असे दामिनी पथकाने सांगितले.

मदतीसाठी करा संपर्क
महिलांसाठी हेल्पलाइन नंबर - ०२२-४५१६१६५३, ८९७६००४१११, ८८५०२००६००
रायगड पोलिस हेल्पलाइन नंबर- ०२१४१-२२८४७३, ८६०५४९४७७२

Marathi News Esakal
www.esakal.com