पिण्याचे पाणी द्या, नाहीतर आमचा जीव जाईल!

पिण्याचे पाणी द्या, नाहीतर आमचा जीव जाईल!

Published on

पिण्याचे पाणी द्या, नाहीतर आमचा जीव जाईल!
कांदिवलीच्या गाजावाडी, आण्णानगरमधील महिलांची विनवणी
कांदिवली, ता. १३ (वार्ताहर) ः कांदिवली पूर्वेतील राजगुरू उड्डाणपुलाजवळील गाजावाडी आणि आण्णानगरमधील झोपडपट्टी वस्‍तीत गेल्‍या सहा महिन्यांपासून पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पाणी भरता भरता आमचा जीव जाईल. त्‍यामुळे लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची व्यवस्‍था करा, अशी विनवणी येथील महिला पालिकेकडे करीत आहेत.
स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर जल अभियंत्‍यांनी येऊन पाहणी केली. त्‍यानंतर पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली. गरजेनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनीतून येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कधी करणार, अजून किती महिने पाण्यासाठी यातना भोगाव्या लागणार, असे प्रश्न त्रस्त झालेल्या महिला पालिकेला विचारत आहेत.
गाजावाडी आणि आण्णानगरमध्ये दाटीवाटीच्या चाळीमध्ये गेल्‍या सहा महिन्यांपासून पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. काही चाळींना सहा इंचाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानंतर नागरिकांना एक तासात चार-पाच भांडी पाणी मिळते. पाणी अत्यल्प प्रमाणात येत असल्याने त्रासलेल्या नागरिकांनी पाणी खेचण्याच्या मोटारी लावल्या. त्‍यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. सातत्याने भांडणे, वाद होत आहेत. काहींना कामावर जाता येत नाही. मुलांना शाळेला उशीर होतो. या विभागात घरकाम करणाऱ्या, हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबीयांची संख्या जास्त आहे. आळीपाळीने पाण्याचे डबे, भांडी भरण्यास पुष्कळ वेळ वाया जातो. काही नागरिक आजूबाजूच्या परिसरातून पाणी आणतात. काही रुग्ण, वयस्क नागरिकांना पाणी भरताना मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
२०१४मध्ये या विभागात माजी नगरसेवक राम आशीष गुप्ता यांनी सुरू केलेल्‍या बोअरवेलमुळे थोडेफार पाणी मिळते. त्याचा वापर कपडे, भांडी आणि अंघोळीसाठी केला जातो. पावसाळा सुरू झाल्यापासून परिस्थिती नसतानादेखील पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल विकत आणाव्या लागतात. मोटार लावल्याने येणारे वाढीव वीजबिल आणि विकत आणलेल्या पाण्यासाठी होणारा खर्च, त्यात पालिकेचे पाण्याचे बिल म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात अशा भयंकर परिस्थितीत रहिवाशांना दैनंदिन जीवन व्यथित करावे लागत आहे.

पाणी नसल्‍याने आम्‍हाला अनेक समस्‍यांचा सामना करावा लागत आहे. पालिकेने लवकरात लवकर याबाबत उपाययोजना कराव्यात अन्यथा एक दिवस पाणी भरता भरता आमचा जीव जाईल.
- शुभांगी शिरसाट, रहिवासी

गेले सहा महिने नळाला पाणी येत नाही. पण महापालिकेची पाण्याची बिले वेळेवर येतात. आम्हाला पाणीच मिळत नसताना बिल येत असल्‍याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- कमल लोहोट

अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्‍या सतावत आहे. लहान लेकरे आजारी पडू नयेत, यासाठी ऐपत नसताना पाण्याच्या बाटल्या विकत आणतो.
- शांताबाई साळवे

जबरदस्तीने महापालिकेकडून लादलेली पाण्याची बिले रद्द करावी. प्रशासनाने आम्‍हाला सहकार्य करावे, ही हात जोडून विनंती.
- लक्ष्मी फावरे, गीता कटम

नव्या जलवाहिनी जोडणीचा प्रस्ताव बांधकाम खात्याकडे पाठविला आहे. पावसाळा असल्याने वेळ लागेल. तात्पुरती टँकर व्यवस्था केली आहे. पाण्याचा दाब वाढवण्यात येणार आहे. प्रस्तावाला लवकर मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- रोहित घोडके
सहाय्यक अभियंता, जलकामे विभाग, आर दक्षिण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com