नाट्यगृहात कीटकांचा उपद्रव

नाट्यगृहात कीटकांचा उपद्रव

Published on

नाट्यगृहात कीटकांचा उपद्रव
नाटकाचा प्रयोग पाडला बंद
संतोष दिवाडकर; सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. १४ : आचार्य अत्रे रंगमंदिरात रविवारी (ता. १३) अभिनेते भरत जाधव यांच्या ‘श्रीमंत दामोदर पंथ’ या विनोदी नाटकाचा प्रयोग पार पडला; मात्र नाटक सुरू असतानाच रंगमंचावरील दिव्यांवर कीटकांचा थवा आला. या घोंघावणाऱ्या कीटकांमुळे भरत जाधव यांच्यावर नाटकाचा प्रयोग मध्येच थांबवण्याची नामुष्की ओढवली; मात्र कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर प्रयोग काही वेळाने पुन्हा सुरू करण्यात आला.

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह दुरुस्तीच्या कामासाठी बंद केल्याने कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात नाट्यरसिक तिकिटासाठी धडपड करताना पाहायला मिळत आहेत. त्यातच अत्रे रंगमंदिरात प्रेक्षकांना आत-बाहेर जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. प्रेक्षक येता-जाताना या दरवाजांची उघडझाप होत असते. शिवाय मंचामागूनही कलाकारांना प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा आहे. या चारही दरवाजांतून कीटक नाट्यगृहात प्रवेश करतात.

रविवारी नाटक सुरू झाल्यानंतर सभागृहातील दिवे बंद केले होते. त्यामुळे केवळ रंगमंचावरचे दिवे सुरू असल्याने प्रखर उजेडाच्या दिशेने कीटकांनी घोंघावायला सुरुवात केली. त्यामुळे नाटक सुरू असताना कलाकारांना कीटकांचा उपद्रव सतावू लागला. त्यामुळे भरत जाधव यांनी रंगात आलेला प्रयोग मध्येच थांबवला. या व्यत्ययामुळे प्रेक्षकांचाही काहीसा हिरमोड झाला. फवारणीनंतर कीटक कमी होताच नाटक पुन्हा सुरू झाले.

नाटगृहात वेळच्या वेळी फवारणी व्हायला हवी, असे मत उपस्थित नाट्यरसिकांनी व्यक्त केले. तर नाट्यगृहात नियमितपणे फवारणी होत असते, असा खुलासा नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांनी केला. काही नाट्यरसिकांनी कधी कधी अस्वच्छता दिसणे, पार्किंगची जागा पुरेशी नाही, शौचालये अपुरी आहेत, खाण्याच्या पदार्थांच्या किमती जास्त आहेत, अशा प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. ३०० ते ५०० रुपये खर्च करून जर आम्ही नाटक पाहात आहोत, तर महापालिका प्रशासनाने तशी सुविधा देण्याची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही प्रेक्षक म्हणत आहेत. तर काही प्रेक्षकांनी वातानुकूलित सभागृह, आरामदायक आसनव्यवस्था व साउंड प्रणाली चांगली असल्याचेही आवर्जून नमूद केले.

खुर्चीचा फोटो व्हायरल
कोरोनातील टाळेबंदीनंतर महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिर नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. मोडकळीस आलेल्या खुर्च्या बदलून नव्या बसविण्यात आल्या होत्या; तरीही खुर्च्या मोडकळीस येण्याचे थांबताना दिसत नाही. एका प्रेक्षकाने समाजमाध्यमांवर मोडलेल्या खुर्चीचा फोटो टाकून नाराजी व्यक्त केली होती.

भरत जाधव यांचे दरवर्षी सहा प्रयोग
संपूर्ण १२ महिने नाट्यगृहात विविध कार्यक्रम पार पडतात. आठवड्याच्या शनिवार व रविवारी दिग्गज कलाकारांचे नाट्यप्रयोग, सांगीतिक मैफल तसेच कॉमेडी शो येथे पार पाडतात. याखेरीज इतर दिवशी शाळा, महाविद्यालयांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक संस्था व राजकीय पक्षांचे मेळावेही या सभागृहात पार पडतात. कल्याणच्या अत्रे नाट्यगृहात भरत जाधव यांचे दरवर्षी पाच ते सहा प्रयोग हमखास होतात. विशेष बाब म्हणजे त्यांचे कल्याणमधील प्रयोग हे हाउसफुल्ल होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com