भरपावसाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य

भरपावसाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य

Published on

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. २० : तालुक्यातील कसारा घाटाच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या बिबळवाडी या आदिवासी वस्तीत भर पावसाळ्यात जुलैमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. तहान भागावी आणि पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी वस्तीतील महिला दीड किमी अंतरावरून डोक्यावरील हंड्यांनी पाणी वाहून नेत आहेत. यात विशेष म्हणजे २५० वर्षांपूर्वीची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली विहीर मोठा आधार ठरली आहे. सध्या याच दीड किमी अंतरावरील या विहिरीवरून बिबळवाडीतील महिला पाणी आणत आहेत. शिल्पकलेचा वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण असलेली ही विहीर येथे टोपाची बारव या नावाने ओळखली जाते.

कसारा घाट माथ्यावर वसलेल्या बिबळवाडीत जानेवारीपासून तीव्र पाणीटंचाई होती. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत या वस्तीला टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. पाऊस चांगला कोसळत असल्याने टंचाई कार्यक्रमातील टँकरचा पाणीपुरवठा थांबवण्यात आला; परंतु या वस्तीत शाश्वत पाणीपुरवठ्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध नसल्याने जुलैमध्येही भरपावसात पाण्याचे दुर्भिक्ष्य सतावू लागले आहे.
बिबळवाडीत मूलभूत वीजपुरवठ्याचीही परिपूर्ण व्यवस्था नाही. सौरऊर्जेवर पाणीयोजना सुरू करण्यात आली होती. ही योजना देखभाल दुरुस्तीअभावी निकामी ठरली. त्यामुळे बिबळवाडीतील पाणीपुरवठ्याचे दृष्टचक्र आणखीनच सतावू लागले आहे. बिबळवाडीला स्वातंत्र्योत्तर काळापासूनच पाणीसमस्या सतावत आहे. त्यावर आजतागायत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाण्याने भरलेले दोन-तीन हंडे डोक्यावर घेऊन दगड, गोट्यांची चिखलातली पायवाट तुडवत उंच टेकडी ओलांडून वस्तीत पाणी आणावे लागत आहे. पाण्याच्या गैरसोयीने येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ‘आम्हाला पाणी द्या’ अशी आर्त मागणी करत आहेत.

‘हर घर नल’ घोषणा अपयशी
बिबळवाडीत आदिवासींची ७० कुटुंबे असून ३५० लोकसंख्या आहे. वर्षभरापूर्वी एका कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अर्थात सीएसआर निधीतून सौर ऊर्जेवर चालणारी लघु पाणीपुरवठा योजना राबविली होती. योजनेची पाणी उचलण्याची मशीन वर्षभरापासून बंद स्थितीत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. योजनेच्या आधारावरच घराघरात नळजोडण्या देण्यात आल्या होत्या; मात्र सद्यस्थितीत येथील नळांना पाणीच नसल्याने सरकारची ‘हर घर नल’ ही घोषणा अपयशी ठरली आहे.

पाणीयोजना दुरुस्तीसाठी सीएसआर निधीचीच गरज
सौर ऊर्जेवरील पाणीयोजना दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुरुस्तीसाठी पुन्हा सामाजिक उत्तरदायित्व निधी उपलब्ध व्हावे, यासाठी मागणी केली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास नादुरुस्त सौर पॅनेल बदलून घेतले जाऊ शकतात. यासोबतच आवश्यक आणखी काही तांत्रिक साधने बदलून घेता येतील. सौर ऊर्जेवर चालणारी पाणीपुरवठा योजना हा एकमेव पाणीपुरवठ्याचा स्रोत बंद असल्याने दीड किमी अंतरावरून पाणी आणावे लागते ही वस्तुस्थिती आहे, असे ग्रामसेवक सतीश ठाकरे यांनी सांगितले.

अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली विहीर ठरतेय आधार
बिबळवाडीपासून दीड किमी अंतरावर मुंबई-नाशिक महामार्गावर टोपाची बारव आहे. ती बिबळवाडीतील पाणीसमस्याग्रस्तांना मोठा आधार ठरली आहे. सुमारे २५० वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी ही विहीर बांधली होती. विहिरीत केरकचरा पडून पाणी दूषित होऊ नये, म्हणून विहिरीवर घुमटाकार बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या बारवमधील पाणी स्वच्छ राहते. विशेष म्हणजे फेब्रुवारी ते जून महिन्यात शहापूर तालुक्यातील सर्व विहिरी तळ गाठत असताना टोपाची बारव मात्र अखेरपर्यंत आटत नाही.

जतन करण्याची विधिमंडळात चर्चा
मुंबई-नाशिक महामार्गावरील होळकरकालीन विहिरींचे जतन करण्याची चर्चा शुक्रवारी (ता. १८) विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आली. या विहिरी ऐतिहासिक ठेवा आहेत. काही ठिकाणी या अमूल्य वारशाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांचे जतन करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. एकीकडे होळकरकालीन बारव जतन करण्याचा मुद्दा विधिमंडळात चर्चेत असताना दुसरीकडे शहापूर तालुक्यातील जुन्या थळ घाटातील आणि सध्याच्या कसारा घाटातील बिबळवाडी या आदिवासी वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी हीच होळकरकालीन बारव आधार ठरल्याचे चर्चेत आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com